उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात ठेवलेला वजनकाटा मापात पाप करत असल्याची साक्ष देत आहे. ५५ किलो वजनाच्या व्यक्तीचे या काट्यावर चक्क २०० किलो दाखवले जाते. Pudhari News Network
ठाणे

Thane News | स्क्रॅप रिक्षांच्या मापात भंगारवाले करताहेत पाप

तांत्रिक पद्धतीने उलगडा करूनही कारवाई शून्यच; रिक्षा संघटनेने उपसले आंदोलनाचे खड्ग

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली (ठाणे) : कल्याण आरटीओ वगळता मुंबईतील अंधेरी आणि ठाणे जिल्ह्यात अन्य ठिकाणी पंधरा वर्षे अर्थात कालबाह्य झालेल्या रिक्षाच्या स्क्रॅपसाठी दहा ते बारा हजार रूपये दिले जातात. तथापी कल्याण आरटीओ असे एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी अशा स्क्रॅप रिक्षाला दोन हजार रूपयांपेक्षा एक छदामही जास्त मोबदला दिला जात नाही.

स्क्रॅप रिक्षांच्या मापात भंगारवाल्यांकडून पाप केले जात असल्याकडे तांत्रिक पद्धतीने उलगडा केला. मात्र तरीही कारवाई केली जात नसल्याच्या निषेधार्थ भाजपा प्रणित रिक्षा संघटनेने आंदोलनाचे खड्ग उपसले आहे. येत्या सोमवारी या घोटाळ्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.

या संदर्भात रिक्षा चालक/मालक संघटनेचे कार्याध्यक्ष तथा भाजपा वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी ठाणे जिल्ह्याच्या परिवहन अधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. नवीन रिक्षा खरेदी करताना शोरूमच्या सेल लेटरवर गाडीचे वजन ४०७ किलो असते. दरवर्षी चालक रिक्षा पासिंग करतो. त्यावेळेला फिटनेस देण्यात येते. अर्थात पासिंग करताना गाडी जशीच्या तशी असते. मात्र ४०७ किलो वजनाच्या रिक्षाची पंधरा वर्षांमध्ये ५७ किलो झीज कशी होते ? असा सवाल जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी उपस्थित केला आहे.

Thane Latest News

इतकी तफावत का ?

झीज झाल्याचे गृहीत धरले तर ४०७- ५७ = ३५० किलो वजन रिक्षा स्क्रॅप करतेवेळी आहे. उदाहरणार्थ ३० किलोच्या प्रमाणेच सर्व भंगार रिक्षांचे ३५० × ३० = १० हजार ५०० रूपये होतात. अंधेरी आरटीओमध्ये चौकशी केल्यानंतर तेथे रिक्षाच्या स्क्रॅपचे चालकांना ९ ते १० हजार रूपये पावतीसह देण्यात येतात. मात्र कल्याण आरटीओकडून पावती दिली जात नाही आणि पैसेही त्या हिशोबात रिक्षावाल्याला दिले जात नाही. कल्याण आरटीओ हद्दीतील चालकाच्या हातावर त्याच्या स्क्रॅप रिक्षाच्या मोबदल्यात अवघे २ हजार रूपये टेकवले जातात. इतकी तफावत का ? असा सवाल जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात ८ ऑगस्ट २०२४ व त्यानंतर १५ डिसेंबर २०२४ रोजी कल्याण आरटीओकडे पत्रव्यवहार केला. शिवाय प्रत्यक्ष भेटून सुद्धा आरटीओकडून कारवाई होत नसल्याने येत्या सोमवारी आरटीओच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणास बसणार असल्याचा इशारा रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष तथा भाजपा वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

बैठकीत समाधानकारक चर्चा

रिक्षा स्क्रॅप केल्यानंतर चालकांना भंगारवाल्याकडून पैसे पूर्ण मिळत नसल्याची तक्रार ८ ऑगस्ट २०२४ रोजी केली होती. आरटीओतील काही कर्मचारी आणि भंगारवाल्यांच्या संगनमताने चाललेल्या लुटी संदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर आरटीओ अधिकारी अशुतोष बारकुल यांनी कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातील रिक्षा संघटना आणि रिक्षा स्क्रॅप करणाऱ्या एजन्सी अर्थात भंगारवाल्यांना समक्ष बोलवून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी बैठक बोलावली होती. त्या बैठकीमध्ये समाधानकारक चर्चा झाली. त्यानंतर पुढील दोन ते तीन महिने रिक्षा चालकाला त्याच्या स्क्रॅप केलेल्या रिक्षाच्या वजनाप्रमाणे पैसे मिळत होते.

फसगत झालेल्यांच्या न्याय हक्कासाठी लढा

गेल्या तीन महिन्यांपासून येरे माझ्या मागल्या सारखी गत झाली. हातावर पोट भरणाऱ्या गरीब रिक्षा चालकाचे पैसे जातात कुठे ? हे तपासण्याची गरज आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या वारंवार लक्षात आणून, तसेच तांत्रिक पुरावे देऊन सुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ येत्या सोमवारी फसगत झालेल्या आणि होणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील समस्त रिक्षावाल्यांच्या न्याय हक्कासाठी, तसेच याचा सोक्षमोक्ष लावण्याकरिता कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीक उपोषण करण्यात येणार असल्याचे रिक्षा चालक/मालक संघटनेचे कार्याध्यक्ष तथा भाजपा वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT