pudhari
पालघर तालुका - दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्र pudhari news network
ठाणे

Thane News | ग्रामीण आरोग्य केंद्रे कात टाकणार

पुढारी वृत्तसेवा
पालघर : नविद शेख

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेची पावले पडत आहेत. जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहेत. तलासरी तालुक्यातील वसा, डहाणू तालुक्यातील आस्वाली, वाडा तालुक्यातील आबिटघर आणि पालघर तालुक्यातील दुर्वेस आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

या चार प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी

  • तलासरी तालुका - वसा प्राथमिक आरोग्य केंद्र

  • डहाणू तालुका - अस्वाली प्राथमिक आरोग्य केंद्र

  • वाडा तालुका - आबिटघर प्राथमिक आरोग्य केंद्र

  • पालघर तालुका - दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्र

प्रत्येकी पावणेआठ कोटी रुपयांचा निधी खर्च करुन सुसज्ज इमारत आणि कर्मचारी वसाहतींचे बांधकाम केले जाणार आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर तांत्रिक मंजुरी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकाम सुरु केले जाणार आहे. जुनी बांधकामे असल्यामुळे अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती मोडकळीस आल्या होत्या.जुन्या इमारतींमधून रुग्णांवर उपचार केले जात आहेत.सोबत विस्तारणार्‍या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी जुन्या इमारतींमध्ये जागा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना आरोग्य सेवा देताना अडचणी निर्माण होत आहेत.दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या इमारतीमध्ये आरोग्य सेवा दिली जात आहेत. तर काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र भाड्याच्या इमारती मध्ये सुरू आहेत.चारही इमारतींच्या बांधकामांची रक्कम 50 लाख पेक्षा अधिक असल्याने प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार सर्वसाधारण सभेला असल्याने प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. जिल्हा नियोजन समिती आणि अन्य निधी मधून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी पावणे आठ कोटी रुपये मिळून एकूण 31 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पालघर जिल्हा निर्मिती पासून ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधकाम करून देण्याची मागणी केली जात होती. जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मागणी नुसार जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत तयार करण्यात आला होता.आरोग्य समिती, मुख कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली होती.

सोमवारी (दि.२२) रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाच्या मंजूरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी मंजूरी देण्यात आली आहे.प्रत्येकी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुसज्ज इमारत आणि कर्मचार्‍यांची वसाहतींचे बांधकाम होणार आहे.

SCROLL FOR NEXT