कल्याण ( ठाणे ) : कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन (डोंबिवली) आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हातगाडी, पथारी असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने शुक्रवार (दि.16) रोजी पूर्वेकडील इंदिरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. 'पार्किंग फलक हटाव फेरीवाला बचाव' या मागणी करता फेरीवाल्यांनी आंदोलन केले.
रस्त्यावर पार्किंगची बोर्ड लावले तर वाहने पार्किंग होणार मग फेरीवाले जाणार कुठे? असा आंदोलनकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला. डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोड वरील पार्किंग फलक पी वन पी टू ची अधिसूचना सन २०१७ रद्द झाली पाहिजे. ज्या ठिकाणी फेरीवाले बसत नाहीत त्या ठिकाणी पार्किंग चे फलक लावल्यास आमचा विरोध नाही, पथ विक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन अधिनियम २०१४ फेरीवाल्याच्या असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असे कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन (डोंबिवली) चे अध्यक्ष बबन कांबळे यांनी सांगितले. आंदोलनात अध्यक्ष बबन कांबळे, फेरीवाला महिला कमिटी आश मगरे, रेश्मा कुरेशी, दिपक भालेराव, अभयलाल दुबे, राजू गुप्ता, नईम खान, अष्टपाल कांबळे, सुनील पाचपुंजे आदी उपस्थित होते.