स्थानिकांनी आतकोली स्थानिक डम्पिंग विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून डम्पिंगला विरोध करण्यास सुरुवात केली आहे.  Pudhari News Network
ठाणे

ठाणेकरांचा कचरा आमच्या दारात नको : आतकोलीत कचराविरोधात संघर्ष समितीची निदर्शने

सर्वपक्षीय नेतेमंडळींचा सहभाग; स्थानिकांचा डम्पिंगला विरोध कायम

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी / पडघा (ठाणे) : ठाणे शहराचा हजारो टन कचरा टाकण्यासाठी भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या आतकोली येथील 86 एकर जमीन शासनाने ठाणे महानगरपालिकेस दिली आहे. या जागेवर कचरा टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यास स्थानिकांनी आतकोली स्थानिक डम्पिंग विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

या आंदोलनात शेकडो स्त्री पुरुष सहभागी झाले होते. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, शिवसेना नेते प्रकाश पाटील, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, शिवसेना उ बा ठा उपनेत्या ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, विश्वास थळे, साईनाथ तारे, विष्णू चंदे, मोनिका पानवे, पंडित पाटील,काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राकेश पाटील,मनसे भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांसह मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील सरपंच व स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

भिवंडी ग्रामीणच्या जनतेच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन सत्ताधारी विसरले आहेत. गावात स्थानिकाला काही करायचे असल्यास ग्रामंचायतीचे ना हरकत दाखला घ्यावा लागतो. शासनाला ही जागा ठाणे महानगरपालिकेच्या घशात घालताना स्थानिकांना विचारण्याची गरज पडली नाही का, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी उपस्थित करीत संघर्ष समितीच्या आंदोलनास पाठिंबा दिला.

डम्पिंग प्रकल्पास स्थानिकांसह सर्वांचा विरोध आहे असल्याचे आंदोलनातून समोर येत आहे.

शासनाच्या नियमांची पायमल्ली

हे डम्पिंग ग्राउंड शासनाच्या सर्व नियमांची पायमल्ली करीत सुरू केले आहे. जिल्हा प्रशासनाने हा निर्णय चुकीचा घेतला आहे. येथील 20 गावांवर अन्याय करणारा आहे. या डंपिंग मुळे येथील विकास ठप्प होणार आहे. हा प्रकल्प रेटून पुढे केला जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळा कडील ना हरकत प्रमाणपत्र न घेताच हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यास आम्ही शेवटपर्यंत विरोध करीत राहू असा निर्धार आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. डम्पिंग प्रकल्पास स्थानिक सर्वांचा विरोध आहे हे आजच्या आंदोलनातून समोर येत आहे. या आंदोलनास सर्व राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. हे डम्पिंग ग्राउंड हटवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढ्यासोबत राहू. पालकमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बैठक घेऊन स्थानिकांना न्याय द्यावा, अशी भूमिका खासदार सुरेश म्हात्रे यांनी मांडली आहे. हा लढा कोणत्या पक्षाचा नसून हा भूमिपुत्रांचा लढा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डम्पिंग ग्राउंड बनवताना त्या जागेपासून एक किलोमीटर अंतरादरम्यान गाव नसावे असे निर्देश असताना या डम्पिंग ग्राउंड भोवती 12 गाव आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची या ठिकाणी पायमल्ली होत आहे.

ठाणे जिल्ह्यातल्या कोणत्याही महानगरपालिका व्यवस्थापन प्रकल्प राबवलेला नाही असे असताना ठाण्यातील कचरा तालुक्याच्या ग्रामीण भागात का टाकणार असा सवाल उपस्थित केला. यावेळी संघर्ष समितीचे पदाधिकारी रमेश शेलार, प्रकाश भोईर,अँड संदीप जाधव व सदस्य यांनी आपल्या विरोधाचे निवेदन तहसीलदार अभिजित खोले यांना दिले. तर यावेळी मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात केला होता.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी सरकार तुमच्या पाठीशी असून संघर्ष टाळून आपण हा डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर बंद करण्यासाठी तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही डम्पिंग विरोधी समितीस दिली. संघर्ष न करता आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री चर्चा करून यावर लवकरात लवकर तोडगा काढू. डम्पिंग ग्राउंड ऐवजी एखादे चांगले सुसज्ज हॉस्पिटल किंवा महाविद्यालय असे प्रकल्प आणल्यास आम्ही त्याचा निश्चितच स्वागत करू. परंतु ठाण्याची घाण आम्ही ते येऊन देणार नाही असे त्यांनी सांगितले.

नागरिकांचा क्षेपणभूमीस विरोध

पडघा येथे डम्पिंग विरोधी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी वाशेरे गावा जवळील रिनायसेन्स कंपनीच्या गेट जवळ केलेल्या या एक दिवसीय धरणे आंदोलनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पडघा अतकोली येथील जमीन ठाणे महानगरपालिकेने क्षेपण भूमीसाठी उपयोगात आणण्यास सुरुवात केली आणि डम्पिंगविरोधी स्थानिक पंचक्रोशी संघर्ष समितीच्या माध्यमातून पंचक्रोशीतील सर्व गावांनी त्यास जोरदार विरोध केला. सदर क्षेपण भूमीचा त्रास हा आजूबाजूच्या असंख्य गावांना होणार असून पडघा, आतकोली, भादाणे, तलवली, सापे, आमणे काही आदिवासी पाडे व आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या गावातील नागरिकांनी धरणे आंदोलनास उपस्थिती दाखवून क्षेपण भूमीस विरोध दर्शविला.

डम्पिंग ग्राऊंड सुरूच कसे झाले?

जिजाऊ संघटनेच्या मीनाक्षी पानवे यांनी स्थानिक आमदारांनी आजपर्यंत का आवाज उठविला नाही किंवा विधानसभेमध्ये हा प्रश्न का मांडला नाही, असा सवाल विचारला. सर्वच राजकीय पक्षांना सत्तेतील व विरोधातील जर डम्पिंग ग्राउंडला विरोध आहे, तर मग डम्पिंग ग्राउंड सुरूच कसा झाला, असा प्रश्न मात्र सामान्य नागरिकांना पडला आहे. आंदोलनाच्या वेळी व्यासपीठावर स्थानिक खासदार सुरेश म्हात्रे, स्थानिक आमदार शांताराम मोरे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे, कुंदन पाटील, उद्योजक पंडित पाटील, पंचायत समितीचे आजी माजी सभापती तसेच सरपंच व इतर राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT