कल्याण तालुका पोलीस ठाण्याने ग्रामीण भागासाठी ‘फिरते पोलीस स्टेशन’ हा एक आगळा-वेगळा व अभिनव उपक्रम सुरू केला आहे. Pudhari News Network
ठाणे

Thane News | गावागावातून फिरत आहे पोलीस स्टेशन; तुम्ही बघितलं का...

कल्याण तालुक्यात फिरते पोलीस स्टेशन; ग्रामीण भागात पोलिसांच्या सेवेचे भरभरून स्वागत

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. धोंडोपंत स्वामी यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका पोलीस ठाण्याने ग्रामीण भागासाठी ‘फिरते पोलीस स्टेशन’ हा एक आगळा-वेगळा व अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची टिटवाळा परिसरातून सुरुवात झाली असून, ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत थेट पोलीस सेवा पोहोचवण्याचा व त्यांच्या समस्या ऐकून त्वरित न्याय देण्याचा यामागे मुख्य हेतू आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकार्‍यांचे पथक गावोगावी फिरते डिजिटल व्हॅन घेऊन जात आहे. नागरिकांशी थेट संवाद साधत, त्यांच्या तक्रारी घरपोच ऐकल्या जात आहेत आणि तत्काळ उपाययोजना केली जात आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक डिजिटल सुविधा असून नागरिकांना नव्या कायद्यांची माहिती देणारे पथचित्रफीत देखील दाखवले जात आहेत.

समस्या जाणून घेत त्वरित कारवाई

या उपक्रमादरम्यान महिलांच्या सुरक्षेबाबत, साखळी चोरीपासून सावधगिरी, बाल लैंगिक शोषणाविरोधातील उपाय, इन्स्टाग्रामचा सुरक्षित वापर, मुलींची छेड काढल्यास मदतीसाठीचे उपाय आणि ट्रॅफिक नियमांचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे. आदिवासी पाड्यांमध्ये तसेच विटभट्ट्यांवर काम करणार्‍या मजुरांपर्यंतही पोलीस स्वतः पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत व त्यावर त्वरित कारवाई करत आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढत असून, पोलिसांविषयीची भीती कमी होऊन जनतेत विश्वासाचे नवे बंध तयार होत आहेत. पोलीस आता आमच्या दारी आले आहेत, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली असून उपक्रमाचे सर्व स्तरांतून भरभरून स्वागत होत आहे.

ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी यांनी या फिरत्या पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचे कौतुक करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. हा उपक्रम आदर्शवत ठरत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT