मिरा रोड : भाईंदर पश्चिम येथील डी-मार्ट च्या पाठीमागे असलेल्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून महापालिकेकडून बांधकाम परवानगी घेतली. त्या कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या महारेराची परवानगी मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदर पश्चिम येथे तक्रारदार गॉर्डन गॅस्पर डिसुजा (६९) यांच्या स्वतःची मालकी जमीन आहे. या जा- गेचे विकासकाने बनावट कागदपत्र तयार केले. त्या कागदपत्रांद्वारे महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळवली. त्याठिकाणी जी.जे. इन्फ्रा कंपनीचे बिल्डर व प्रमोटर जय हरेश मेहता (४५) याने ५ एप्रिल २०२१ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत गॉर्डन गॅस्पर डिसुजा (६९) व ईस्ट ईंडीयन हेरीटेज डेव्हलपर्स प्रा. लि. चे इतर दोन संचालक ब्रुनो जॉन डिसुजा (८०) अल्फान्सो डॉमनिक ताव, ( ७०) यांच्या बनावट सह्या करुन त्या खऱ्या असल्याचे भासवुन रेरा प्राधिकरण यांना बोगस व बनावट कागदपत्रे दिले. तसेच त्यामध्ये तक्रारदार यांच्या नावाचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र सादर केले. त्या कागदपत्रांवरून महारेराची परवानगी मिळवली आहे. तक्रारदाराची फसवणुक केल्या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी आडसूळे हे करत आहेत.