माळशेज भाळी काचेचा पूल यांच्या गावगव्याचे वस्तुनिष्ठ सत्य आता मुरबाडी जनतेच्या समोर येत चालले आहे. pudhari news network
ठाणे

Thane News | कागदावरची रेल्वे अन् काचेचा पूल..!

पुढारी वृत्तसेवा
मुरबाड : किशोर गायकवाड

गेल्या दशकभरापासून मुरबाडच्या राजकारणाचा केंद्र ठरविलेल्या रेल्वे प्रकल्प आणि त्याचा मावसभाऊ म्हणून अकस्मात उदयास आणलेला माळशेज भाळी काचेचा पूल यांच्या गावगव्याचे वस्तुनिष्ठ सत्य आता मुरबाडी जनतेच्या समोर येत चालले आहे. भौगोलिक दृष्ट्या विस्तृत आणि समृद्ध मानला जाणारा मुरबाड तालुका गेल्या काही वर्षांपासून राजकीय गराड्यात कुचेष्ठेचा भाग बनल्याचे अनुभवात पडत आहे.

मुंबईपासून संलग्न अंतरावर असलेला मुरबाड तालुका आजतागायत दळणवळणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित भासत आहे. निम्म्याहून अधिक बंद एमआयडीसी व असुरक्षित तथा जीर्ण ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे वगळता एखादा कृत्रिम प्रकल्प देखील मुरबाडमध्ये सांगता येणार नाही. या खेरीज शैक्षणिक क्षेत्रातील अपेक्षित एखादं भव्य मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज अथवा आयटी हब यांसाठी किमान प्रयत्न तरी व्हावेत; याबाबत मुरबाडच्या राजकारण्यांना हालचाली करण्यात स्वारस्य वाटत नाही; हे नवलच! आजही मुरबाडमधून खूप मोठा चाकरमानी व विद्यार्थी वर्ग नोकरी तसेच शिक्षणासाठी मुरबाडच्या बाहेर स्थलांतर करीत असतो, या अपयशाला जबाबदार कोण?

त्यात इथल्या आयात राजकारण्यांनी चांगलीच मुरबाडकारांची थट्टा चालवली आहे. रेल्वेच्या तीव्र प्रतिक्षेत पूर्ण एक दशक खर्ची केलेल्या मुरबाडवासीयांच्या भोळेपणाचा आधार घेत भाजपा आमदार यांनी पुन्हा काचेच्या पुलाचा स्वप्न भाबड्या मुरबाडकरांच्या समोर आणून ठेवला.

रेल्वेच्या स्वप्नभंगातून पूर्णपणे बाहेर न पडलेल्या मुरबाडच्या आशावादी जनतेला सातत्याने काचेच्या पुलाच्या मृगजळाला भाळण्याचे प्रयत्न सुरूच आहे. माजी भाजपा खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मुद्द्यावर भर देत दोन टर्म पूर्ण केल्या. दरम्यान त्यांनी कल्याण - मुरबाड रेल्वे प्रकल्पाला किमान केंद्रीय अर्थसंकल्पात 10 कोटी 36 लाखांचा वाटा देऊन कागदावर चिटकविण्यात तरी यश मिळविले. हाच पायंडा पुढे हाकत मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे यांनी माळशेजी काचेच्या पूलाचा मोड समोर करीत येत्या मुरबाड असेंम्बलीमध्ये हट्रिक प्लसची तयारी केली आहे. राज्यात द्वितीय क्रमांकांची मते प्राप्त आमदार कथोरेंना निवडणूक पूर्व विजयी घोषित करण्यात आले आहे. किंबहुना मुरबाड विधानसभेच्या मतदार लोकांपुढे सक्षम पर्याय देखील नसल्याने किसन कथोरे यांचा विजयाचा मार्ग ही खडतर म्हणता येणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT