पालघर : वरई पारगाव रस्त्यावरील गिराळे गावच्या हद्दीतील जंगलातून सुरु असलेली खैर तस्करी ग्रामस्थांनी उघडकीस आणली आहे. मंगळवारी (दि.13) रोजी पहाटे चालण्यासाठी जात असलेल्या ग्रामस्थांनी खैराच्या ओंडक्यांची वाहतूक करणारा टेम्पो पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला आहे. मौल्यवान खैर जातीच्या लाकडाचे ओंडके टेम्पो वनविभागाच्या कर्मचार्यांनी ताब्यात घेतला असून टेम्पो चालक आणि मालका विरोधात वन अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील वरई पारगाव रस्त्यावरील जंगलात मौल्यवान खैराच्या झाडांची संख्या लक्षणीय आहे.या भागात खैर तस्कर सक्रिय असल्यामुळे खैराच्या झाडांची कत्तल आणि अवैध वाहतूक होत असते.खैर तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.खैराची वाहतूक करणारी वाहने वनविभागाकडून जप्त करण्यात आली आहेत.
गिराळे गावाचे ग्रामस्थ मंगळवारी सकाळी वरई पारगाव रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी जात असताना जंगलातून संशयास्पद हालचाल आढळून आली.ग्रामस्थांनी पाहणी केली असता जंगलाच्या हद्दीत एक टेम्पो दिसून आला.ग्रामस्थांची चाहूल लागताच खैर तस्कर पळून गेले. टेम्पोची पाहणी केली असता टेम्पो मध्ये खैराचे ओंडके आढळून आले.खैराची वाहतूक करताना चोरट्यांचा टेम्पो चिखलात रुतला होता,अथक प्रयत्न करूनही पहाटे पर्यन्त टेम्पो चिखलातून बाहेर पडला नसल्याने चोरट्यांचा डाव फसला.गिराळे गावचे ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती दहिसर वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून खैराचे ओंडके आणि टेम्पो ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी वन अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिसर वनपरिक्षेत्रात मौल्यवान खैर आणि सागवान तस्करांच्या वावर वाढला आहे.खैर तस्करांविरोधात कारवाईचे आव्हान वनविभागा समोर उभे ठाकले आहे.