डोंबिवली (ठाणे) : कल्याण-डोंबिवलीकरांच्या जाचक समस्या जैसे थे आहेत. अधांतरी लटकलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आलेली नाही. यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न निकाली काढण्यात आलेला नाही. विकासकामांच्या भूमीपूजनात पाणी पुरवठा योजना आहे कुठे ? असा सवाल मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.
विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावर पाटील यांनी खोचक टीका केली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी जनतेला सर्वाधिक सतावणारा पाणी प्रश्न उपस्थित केला आहे.
कल्याण-डोंबिवलीतील वेगवेगळ्या विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी एक्स ट्विटच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली आहे. चला चला भूमीपूजनांची वेळ आली...पालिकेची निवडणूक आली...भूमीपूजन केलेल्या पलावा पूल, लाेकग्रामपूल, दिवा आरओबी, अमृत पाणी पुरवठा योजना यांचे लोकार्पण कधी होईल ? आमची एक महिला भगिनी महानगरपालिकेच्या दवाखान्याबाहेर रूग्णवाहिकेअभावी मृत्यूमुखी पडली. सुतिकागृहाचे काम अजून का सुरु झाले नाही ? आदी सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन, वाहतूक नियोजन, रस्त्यांची सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभियानाचा डोंबिवलीतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या मैदानात सायंकाळी या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. त्याचबरोबर कल्याण-शिळ महामार्गावर दावडी येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमीटेड संचलीत कौशल्यवर्धन केंद्र, सेंटर फॉर इन्व्हेंशन इनोव्होवेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. त्याचेही भूमीपूजन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले.
या पार्श्वभूमीवर मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी ट्वीटद्वारे लक्ष वेधले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण-डोंबिवलीत काही भूमीपूजने होत आहे. या बद्दल कल्याण-डोंबिवलीकर जनतेला शुभेच्छा व पालकमंत्र्यांचे आभार. या निमित्ताने अनायसे माननीय पालकमंत्री आज कल्याण-डाेंबिवलीत येत आहे. तर त्यांनी २०१८ मध्ये भूमीपूजन केलेल्या पलावा पूल, लोकग्राम पूल, दिवा आरोबी, २७ गावांतील अमृत योजनेचा आढावा घेऊन त्याच्या लोकार्पणाची तारीख जाहिर करावी.
एकीकडे केडीएमटीच्या ताफ्यात २०० इलेक्ट्रिक बसेस येणार असल्याने प्रवाश्यांत आनंदाचे वातावरण आहे. तथापी केवळ चार्जिंग स्टेशन नसल्याने या बसेस येत नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल. आमची एक महिला भगिनी महानगरपालिकेच्या दवाखान्याबाहेर रूग्णवाहिका नसल्याने मृत्यूमुखी पडली. डोंबिवलीतील सुतिकागृहाचे काम रखडले, ते का सुुरू होत नाही ? याचा आढावा घेऊन त्यावर खुलासा करावा. बाकी कल्याण-शिळ महामार्गाचा बट्ट्याबोळ झाला आहे. रस्ते बाधीतांच्या मोबदल्या अभावी रखडलेल्या तिसऱ्या मार्गिकेचे भूसंपादन, मेट्रोचे बेशिस्त काम, रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे, हा सर्व त्यांच्याच खात्याचा प्रताप आहे. त्यावरही सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा करूया, अशा अपेक्षा राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंकडून व्यक्त केल्या आहेत.