सरकारी रुग्णालय
प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयांना प्राधान्य pudhari news network
ठाणे

Thane News | ग्रामीण भागात गृह प्रसुतीचे प्रमाण घटले

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : गेल्या काही वर्षांत वैद्यकीय उपचारांच्या खर्चात तिपटीने वाढ झाली आहे. दिवसेंदिवस उपचार व औषधांचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळू लागल्याने प्रसूतीपूर्व उपचार आणि प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयांना प्राधान्य दिले जात आहे. गेल्या वर्षभरात ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्ह्यात १४ हजार ६२५ महिलांची सार्वजनिक रुग्णालयांत यशस्वी प्रसूती झाली आहे. तर गृह प्रसूतीच्या प्रमाणातही दिवसेंदिवस घट होत असून, तीन वर्षांपूर्वी ५२ वर असलेले गृह प्रसुतीचे प्रमाण आता १० वर आले आहे.

जननी सुरक्षा योजनेंतर्गत गर्भवती महिलांकडे अधिक लक्ष दिले जाते. अगदी महिलेला प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्यानंतर मोफत वाहन पाठवून तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात आणले जाते. प्रसूतीसह औषध उपचारांचा खर्च मोफत आहे. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ गर्भवती महिलेला दिला जातो. त्यातून जिल्ह्यातील अधिकाधिक प्रसूती शासकीय रुग्णालयांत होत आहेत.
डॉ. स्वाती पाटील, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे.

विविध सरकारी योजनांचा लाभ आणि चांगल्या आरोग्य सुविधांमुळे गेल्या काही वर्षांत सार्वजनिक आरोग्य यंत्रणेपासून दुरावलेला रुग्ण परतू लागला असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले. सामान्यतः सरकारी रुग्णालय म्हटले की अस्वच्छता, डॉक्टरांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा, रुग्णांची हेळसांड हे दृश्य नजरेसमोर येते. मात्र, याला छेद देत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्यसेवा बळकट होत आहे. खासगी ठिकाणच्या वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या तुलनेत सरकारी रुग्णालयात मोफत प्रसूती होते. खाजगी रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीचा सामान्यतः खर्च ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत येतो. तर शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या प्रसूतीच्या खर्च ५० ते ७० हजारावर पोहोचतो. याउलट सरकारी रुग्णालयांत मातृवंदना योजनेचा फायदा महिलांना होतो. त्यात आर्थिक अनुदानाचा लाभ दिला जातो. सरकारी रुग्णालयात सिझरिंगच्या अनेक केसेस नॉर्मल करण्यात येथील डॉक्टर यशस्वी ठरले आहेत.

प्रसूतीसाठी सरकारी रुग्णालयांना प्राधान्य आकडेवारी

प्रसूतीपूर्व महिलेला मोफत आणण्याची सुविधा

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरी प्रसूती करण्यावर भर दिला जातो. यामध्ये बाळ व आईच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती व्हावी यासाठी सरकारी पातळीवर अधिक प्रयत्न होत आहेत. यासाठी परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात येत असून, १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून प्रसूतीपूर्व महिलेला मोफत आणण्याची सुविधा आहे. त्यामुळे रुग्णालयात सहज पोहोचणे आता शक्य झाले आहे.

SCROLL FOR NEXT