बदलापूर : बदलापूर पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत ज्युनिअर केजीमध्ये शिकणाऱ्या ४ वर्षीय दोन मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी सांगितले.
१३ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता शाळेत गेलेली ही मुलगी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आली शाळेत बाथरूमला गेले असता शाळेतील एकाने आतपर्यंत हात लावल्याचे आईला सांगितले. या मुलीला पोटात खूप दुखू लागल्याने डॉक्टरांना दाखवले असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आणि हे कुटुंब हादरून गेले. दुसरी विद्यार्थिनी आजोबांकडे गेली असता तिच्याही पोटात दुखायला लागले. आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने शाळेत घडलेला प्रकार ऐकवला. या मुलीला डॉक्टरकडे नेण्यात आल्यानंतर अत्याचाराची तीच कहाणी पुढे आली.
शाळा प्रशासनाला जाब विचारला असता शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग होत नाही, अशीही उत्तरे शाळा प्रशासनाने दिली. शेवटी या मुलींच्या पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाणे गाठले. तिथेही विचित्र अनुभव आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी पालकांना बसवून ठेवले. दुपारी बारा वाजता हे पालक पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र, थेट रात्री साडेबारा वाजता पोक्सोचा गुन्हा दाखल झाला.