नेवाळी : कल्याण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होर्डिंगचे जाळे उभारले गेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील होर्डिंग्स धोकादायक स्थितीत असल्याचे चित्र समोर आले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गेलेल्या 14 गावातील दहिसर मोरी येथील होर्डिंगचे पत्रे हवेत उडत आहेत. त्यामुळे सोसाट्याच्या वार्यासह हा सांगाडा महामार्गावर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने शासनाने ठोस पाऊल उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिरातीचे होर्डिंग उभे राहिले आहेत. मात्र अनेक कंपन्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्ट्रक्चरल ऑडिट न केल्याने ते धोकादायक स्थितीत दिसून येत आहेत. कल्याण ग्रामीण भागातून जाणार्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर दुर्घटनेला निमंत्रण दिल जात आहे. भल्या मोठ्या लोखंडाच्या सांगाड्यावरील पत्रे हवेत उडत आहेत. या परिसराचा कारभार अजून नवी मुंबई महापालिकेने हाती घेतला नाही. तर शासन दरबारी लोकप्रतिनिधींकडून देखील पाठपुरावा सुरू असलेला थंडावला आहे. सध्या या परिसरात अनेक दुर्घटनांची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून देखील या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष दिल जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
दहिसर मोरी येथे असलेल्या मारुती पेट्रोल पंपाच्या जवळ एका इमारतीवर जाहिरात होर्डिंगवरील पत्रे हवेत उडत आहेत. त्यामुळे या परिसराकडे कोण गांभीर्याने लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती कल्याण ग्रामीणमध्ये होऊ नये यासाठी कोण पुढाकार घेणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.