शहापूर (ठाणे) : राजेश जागरे
शहापूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील माध्यमिक शाळांवर वाढत्या अशैक्षणिक कामांचा ताण दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट परिणाम अध्यापन व विद्यार्थी गुणवत्तेवर होत आहे. ग्रामीण भागातील शाळांना नेटवर्क, साधन-सुविधा व मनुष्यबळाची कमतरता भेडसावत असताना, शहरी भागातील शाळांना मोठ्या विद्यार्थीसंख्येमुळे व प्रशासकीय कामकाजामुळे अडचणी निर्माण होत असल्याचे शहापूर तालुका मुख्याध्यापक संघाने स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर २६ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या सभेत तालुका मुख्याध्यापक संघाने काही अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला असल्याची माहिती तालुका अध्यक्ष दत्तात्रय किरपण यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.
ग्रामीण शाळांमध्ये इंटरनेट व नेटवर्क उपलब्ध नसल्याने ऑनलाईन उपक्रम पूर्ण होऊ शकत नाहीत. डोंगरपठारी व दुर्गम भागातील शाळांत मोबाईल कनेक्टिव्हिटीही अपुरी असून शहरी शाळांत मोठी विद्यार्थीसंख्या व अनेक तुकड्या असल्यामुळे शिक्षकांवर ताण पडतो. प्रशासकीय कामे वाढल्याने अध्यापनाला वेळ कमी मिळतो. या विसंगतीमुळे ग्रामीण-शहरी शिक्षण व्यवस्थेत दरी निर्माण होत असल्याचा आरोप मुख्याध्यापक संघाने केला आहे.
बहुतांश शाळांमध्ये मोठी विद्यार्थीसंख्या असताना दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण करणे अवघड आहे. एका शिक्षकाकडे अनेक वर्ग असल्याने इतर तासावर परिणाम होत आहे. ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने परीक्षा अपूर्ण राहते. साधन-सुविधा नसताना मोबाईल व इंटरनेटचा आग्रह अन्यायकारक आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ न होता उलट त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मुख्याध्यापक संघाने नमूद केले आहे.
ग्रामीण व शहरी शाळांत तीन ते चार तास खर्च होत असून यु-डायस व ऑनलाईन हजेरी क्रमांकात तफावत आहे. अनेक तुकड्या असलेल्या शाळांत उपस्थिती प्रणाली अवघड आहे. ग्रामीण शाळांत नेटवर्क नसल्याने दैनंदिन नोंदणी अडते. परिणामी तासिका पद्धती बिघडते, वर्ग रिकामे राहतात. दैनंदिन उपस्थितीचा गुणवत्तेशी काही संबंध नाही असे स्पष्ट मत संघाने नोंदवले.
शासनाने ग्रामीण-शहरी शिक्षणातील दरी वाढवणारी व्यवस्था तात्काळ थांबवावी. अशैक्षणिक कामांपेक्षा अध्यापनाला प्राधान्य द्या. तसेच ग्रामीण भागातील भौतिक सुविधेला प्राधान्य द्यावे. शाळांवरील प्रशासकीय भार कमी करावा. दरम्यान विद्यार्थ्यांच्या हितासाठी तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांनी वरील कामांवर बहिष्कार जाहीर केला आहे.दत्तात्रय किरपण, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ शहापूर.
वेळखाऊ अहवाल व दस्तऐवजीकरण हे सर्व ग्रामीण शाळांसाठी अवघड ठरत असल्या माध्यमिक शाळांना या स्पर्धेत सहभागी होता येत नाही, असे संघाचे म्हणणे आहे. तसेच मूल्यवर्धित अध्यापनावर बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होत असल्यामुळे मुख्याध्यापकांमध्ये नाराजी पसरली आहे. शिक्षक आधीच मूल्य रुजवणुकीचे काम करत असतात. किंबहुन शाळांमध्ये खाजगी संस्थेला वर्गात प्रवेश देणे नियमबाह्य आहे. ग्रामीण शाळांत परिचारक/सुविधा नसताना निरीक्षणाचा ताण अधिक शाळेच्या अधिकारात हस्तक्षेप असल्याचा आरोप होत आहे.