डोंबिवली : कालबाह्य झालेल्या रिक्षांच्या स्क्रॅपमध्ये चालणारा झोल चव्हाट्यावर आला आहे. चालक/मालकाला त्याच्या रिक्षाचा मोबदला नगण्य मिळतो, तथापी त्याच्या स्क्रॅप रिक्षातून दलालांसह भंगारवाल्यांचं मात्र चांगभलं होताना दिसत आहे. ज्या रिक्षाने व्यवसायातून अर्थप्राप्ती करून दिली त्या लक्ष्मी स्वरूप रिक्षाची तोडमोड झाल्यानंतर चालक/मालकाचे रिक्षाच्या तुकड्यासह एखाद्या गुन्हेगारासारखे पाटी लावून फोटोही काढले जात असल्याने अशा बेधुंद कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, याकडे भाजपाच्या वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.
रिक्षा स्क्रॅप करताना कल्याण आरटीओकडून रिक्षाचालकांची चाललेली लूट थांबवा, या विषयांतर्गत परिवहन मंत्र्यांसह आयुक्त विवेक भिमनवार यांना काही पुराव्यांसह निवेदन वजा लेखी तक्रार देण्यात आली आहे. भाजपा प्रणित डोंबिवली रिक्षाचालक-मालक संघटनेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधताना जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी रिक्षाची तांत्रिक माहिती दिली आहे. नवीन रिक्षा घेताना शोरूमच्या सेल लेटरवरती रिक्षाचे वजन 407 किलो असते. वर्षानुवर्ष रिक्षा चालवत असताना प्रत्येक वर्षी रिक्षाची पासिंग केली जाते. त्यावेळेस फिटनेस सर्टिफिकेट दिले जाते. त्याच रिक्षाचे स्क्रॅप करतेवेळी वजन 407 किलोच भरते. पंधरा वर्षांमध्ये 57 किलो जरी रिक्षाची झीज झाल्याचे गृहीत धरले तरीही स्क्रॅप करतेवेळी 350 किलो भरेल. 30 रूपये किलो प्रमाणे भंगाराचा चालू बाजारभाव असला तरीही रिक्षावाल्याला त्याचा मोबदला 10 हजार 500 रूपये मिळायला हवा.
अंधेरी आरटीओसह अन्य ठिकाणी चौकशी केली असता तेथील चालकांना त्यांच्या स्क्रॅप रिक्षाचे 9 ते 10 हजार रुपये पावतीसह देण्यात येतात. तथापी कल्याण आरटीओकडून स्क्रॅप रिक्षाचे विनापावतीचे अवघे 2 हजार रूपये हातावर टेकवले जातात. इतकी तफावत का? असा सवाल उपस्थित करून जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी कल्याण आरटीओ, दलालांसह भंगारवाल्यांवर निशाणा साधला आहे.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कल्याण आरटीओचे अधिकारी आणि भंगारवाले काही दलालांच्या माध्यमातून हा गोरख धंदा करत आहेत. तो त्वरित थांबवावा आणि रिक्षा चालकाला त्याच्या रिक्षाच्या वजनानुसार मोबदला द्यावा, अशी आमची रास्त मागणी असल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता माळेकर यांनी परिवहन मंत्र्यांसह आयुक्त विवेक भिमनवार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कल्याण, डोंबिवली, बदलापूर उल्हासनगर, अंबरनाथ इतर कल्याण परिक्षेत्रातील शेकडो गरजू वेगवेगळ्या कामांसाठी कल्याण आरटीओ कार्यालयात येतात. भंगारवाले या कार्यालयाच्या आवारात उघड्यावर गॅस बाटले ठेवतात. एखाद्या वेळी याच बाटल्यांचा जर स्फोट झालाच तर मोठी जीवितहानी होऊ शकते. वेळोवेळी निदर्शनास आणूनही कल्याण आरटीओ कार्यालय या गंभीर समस्येकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्याच्या जबाबदार परिवहन मंत्र्यांसह आयुक्तांनी वेळीच लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा. कल्याण आरटीओच्या आवारात उघड्यावर स्क्रॅप करणार्या भंगारवाल्यांवर बंदी आणावी. रिक्षाचालकांना लूटणार्या भंगारवाल्यांसह दलाल आणि संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी. अन्यथा रिक्षा संघटनांच्या माध्यमातून येत्या काळात आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा दिला आहे. आता परिवहन मंत्र्यांसह आयुक्त विवेक भिमनवार यावर काय निर्णय घेतात याकडे संघटनांसह रिक्षाचालकांच्या नजरा लागल्या आहेत.
आरटीओकडून सोमवार आणि गुरूवार असे आठवड्यातून दोन वार ठरवले आहेत. याच दिवशी चालकांनी त्यांची रिक्षा कार्यालयाच्या आवारात असेल त्या अवस्थेत आणावी. संख्या कमी असल्यास भंगारवाला रिक्षा स्क्रॅप करत नाही. त्यामुळे चालकाला त्याची रिक्षा तेथून परत घरी न्यावी लागते. बंद पडलेल्या अवस्थेतील रिक्षा टेम्पोत टाकून आरटीओला आणून परत न्यायची झाल्यास 4 हजारांचा हकनाक वाहतूक खर्च करावा लागतो. हा भुर्दंड गरीब रिक्षावाल्याने का सोसावा? जर रिक्षा आरटीओ कार्यालयामध्येच ठेवली तर तिचे टायर चोरीला जातात. अशावेळी मग तोच अधिकारी टायर नसल्याचे निमित्त सांगून रिक्षा स्क्रॅपला मंजूर देत नाही. परिणामी रिक्षा चालकाची कोंडी होते.