ठाणे : ठाणे शहराच्या बाळकूम, विवियन मॉल समोर, कोपरी आणि घोडबंदर रोड ब्रह्मांड या ठिकाणी रस्त्यावर अज्ञात वाहनातून ऑइल रस्त्यावर पडण्याच्या घटना वाढत जात आहेत. 41 दिवसात ठाण्याच्या विविध भागात ऑइल सांडण्याच्या 26 घटनांची नोंद करण्यात आलेली आहे. तर मागील 24 तासात ठाण्यात मंगळवारी (दि.10) संध्याकाळ ते बुधवारी (दि.11) दुपारपर्यंत 24 तासाच्या आत ऑईल सांडण्याच्या 4 घटनांची नोंद ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेली आहे.
ठाण्याच्या बाळकूम परिसरातील पहिली घटना बाळकुम अग्निशमन केंद्र समोर, बाळकुम, ठाणे (प.) या ठिकाणी माजीवाडाकडे जाणार्या ब्रिज वरती ऑईल सांडल्याची घटना मंगळवारी 6-10 वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दुसरी घटना बुधवारी पहाटे 4-50 वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या विवियाना मॉल समोर, मुंबई-नाशिक रोड, ठाणे (प.) या ठिकाणी नितीन-कॅडबरी ब्रीज उतरताना भारत बेंझ हेवी ट्रकमधून ऑइल सांडण्याची घटना घडली. वाहनाचा अपघात झाल्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केल्यानंतर वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला.
तिसरी घटना बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भारत कॉलेज जवळ, भाजी मार्केट, कोपरी, ठाणे (पु.) या ठिकाणी रोडवरती ऑईल सांडल्याची घटना घडली. ऑइलवर माती टाकून वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला.
चौथी घटना ठाण्याच्या घोडबंदर रोडवर काबरा गॅरेज जवळ, क्सिस बँक समोर, ब्रह्मांड, घोडबंदर रोड, ठाणे (प.) या ठिकाणी रोडवरती शेजवान चटणी व ऑईल सांडण्याची घटना घडली. या चारही घटनांमध्ये घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने मदतकार्य करीत ऑइलवर माती टाकून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
ठाण्यात विविध प्रभाग समितीत आणि महामार्गावर, शहरात अज्ञात वाहनातून किंवा अपघातग्रस्त वाहनातून ऑइल गळतीच्या 20 घटना नोव्हेंबरच्या महिन्यात घडल्या आहेत. तर दुसरीकडे डिसेंबरच्या 11 दिवसांमध्ये ऑइल सांडण्याच्या 10 घटना घडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
ठाणे शहरात विविध ठिकाणी आणि महामार्गावर ऑईल सांडण्याच्या वाढत्या घटनाक्रमामुळे महामार्गावर वाहनांना किंवा दुचाकींना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. रस्त्यावर धावणार्या वाहनातून किंवा अपघातग्रस्त वाहनातून ऑइल सांडण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्र तपासणीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.