ठाणे : शाळांच्या वार्षिक परीक्षा संपताच बच्चे कंपनीला मामाच्या गावाला जायचे वेध लागतात. एस. टी. महामंडळाच्या ठाणे विभागातून 15 एप्रिलपासून उन्हाळ्यासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
15 जूनपर्यंत ठाणे विभागातून लांब व मध्यम पल्ल्याच्या जादा बसेस ठाणे जिल्ह्यातील आगारातून सोडण्यात येणार आहे. या कालावधीत सातार्याला जाण्यासाठी ठाणे शहरातील वंदना बसस्थानकातून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत दर 1 तासाने बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच ठाणे - स्वारगेट (पुणे) या मार्गावर दर अर्ध्या तासाने ई - शिवनेरी बस सोडण्यात येणार आहे. एस. टी. महामंडळाच्या वतीने 75 वर्षांच्यापेक्षा आधिक वय असणार्या प्रवाशांना ज्येष्ठ नागरिक योजनेतंर्गत मोफत प्रवासी सेवा आहे. 65 ते 74 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना सन्मान योजनेतंर्गत प्रवासात 50 टक्के सवलत सुरू आहे.
याशिवाय कल्याण आगारातून कल्याण - बामनोली, लोणार, वडुज, धुळे, जामखेड, मुरबाड-कल्याण - शिरूर (व्हाया लोणी, कल्याण - शिरूर (व्हाया जांबुत), कल्याण-शिरूर (व्हाया बेल्हा), बदलापूर-घोट, विठ्ठलवाडी-गुहागर, विठ्ठलवाडी- दापोली, गुहागर, भीमाशंकर या मार्गावर बसेसे सोडण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदा उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या 764 फेर्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेर्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवाशी गर्दी होणार्या मार्गावर 15 एप्रिल पासून जादा फेर्या टप्याटप्याने सुरू करण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत राज्यातील विविध मार्गावरील 764 जादा फेर्यांना मंजुरी देण्यात आली असून या जादा फेर्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.