डोंबिवली (ठाणे) : बहुतांश सर्व शाळा येत्या सोमवार (दि.16) पासून सुरु होत आहेत. डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली रस्त्याच्या शेलार नाका ते शंकर मंदिर दरम्यान काँक्रीटीकरणाचे पहिल्या टप्प्याचे काम सुरु आहे. मात्र या रस्त्याच्या काँक्रीटीकरणात अनेक त्रुटी असल्याचे मनसेने केलेल्या पाहणी दौऱ्या दरम्यान आढळून आल्या. मनसेचे माजी शहराध्यक्ष मनोज घरत यांनी या रस्त्याच्या कामाचा फज्जा उडविणाऱ्या ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले.
याच रस्त्याला आचार्य भिसे गुरूजी शाळा देखील आहे. ही शाळा सुद्धा सोमवार पासून सुरु होत आहे. या शाळेच्या शिक्षकांसह स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत मनसेचे माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष मनोज घरत यांनी सदर कामांची पाहणी केली असता काँक्रीटीकरणाच्या कामात अनेक त्रुटी आढळून आल्या. कंत्राटदाराला बोलावून सर्व गोष्टी त्यांना दाखवण्यात आल्या. काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी कलव्हर्टची कामे अपूर्णावस्थेत आहेत. तिथे सुद्धा अपघात झाले आहेत.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अनेक ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली नाही. शाळा सुरू झाल्यावर या रस्त्याने शालेय बसेस मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. हा रस्ता बंद असेल तर पाथर्ली गावातील अरुंद रस्त्याने बसेसची वाहतूक करणे शक्य होणार नाही. वाहतुकीचा खोळंबा होऊन शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होऊ शकतो. त्यामुळे रस्त्यांच्या कामांत राहिलेल्या त्रुटी काढून त्या दुरूस्त करून घेण्यात याव्यात. ही सर्व कामे शाळा सुरू होण्याआधी अर्थात रविवारपर्यंत पूर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी ताकीद मनसे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी ठेकेदाराला दिली. यावेळी मनसेचे विभागाध्यक्ष रविंद्र गरूड, भाजपाचे माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, यांच्यासह स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.