ठाणे

Thane News | मिरागाव मेट्रो स्टेशनची एंट्री-एक्झिट 1 अडकली परवानगीत

पुढारी वृत्तसेवा
भाईंदर : राजू काळे

दहिसर ते भाईंदर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्प 9 अंतर्गत मिरागाव मेट्रो स्टेशनला दोन एंट्री, एक्झिट देण्यात येणार आहेत. मात्र यातील 1 एंट्री, एक्झिटसाठी जागा देणार्‍या बिल्डरला पालिकेकडून बांधकाम परवानगीच देण्यात आलेली नाही. तर एंट्री, एक्झिट 2 पालिकेच्या सेंट्रल जकात नाक्याच्या आरक्षित जागेत प्रस्तावित करण्यात आली असून त्याची जागा पालिकेने एमएमआरडीएकडे अद्यापही हस्तांतर केली नसल्याने त्याअभावी मिरागाव मेट्रो स्टेशनच्या दोंन्ही एंट्री, एक्झिटचे काम प्रलंबित राहिल्याचे समोर आले आहे.

एमएमआरडीएकडून एमएमआर प्रदेशात सुमारे 337 किलो मीटरचे मेट्रो नेटवर्क तयार करण्यात येत आहे. त्याचाच भाग असलेल्या दहिसर पूर्व ते भाईंदर पश्चिम दरम्यानच्या मेट्रो प्रकल्प 9 दोन टप्प्यात सुरु केला जाणार आहे. यातील दहिसर ते मिरागाव (काशिगाव) हा पहिला टप्पा येत्या डिसेंबर 2024 मध्ये सुरु करण्याचा प्रयत्न एमएमआरडीएकडून केला जात आहे. तर मिरागाव ते भाईंदर पश्चिमेकडील दुसरा टप्पा डिसेंबर 2025 मध्ये सुरु करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने मेट्रो प्रकल्प 9 तातडीचा सार्वजनिक प्रकल्प तसेच महत्वाचा नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित केला आहे.

मेट्रोचे काम रेंगाळणार

मिरागाव मेट्रो स्टेशनची एंट्री, एक्झिटचे काम बिल्डरच्या बांधकाम परवानगीत अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एंट्री, एक्झिट 2 साठी पालिकेची सेंट्रल जकातीची आरक्षित असलेली जागा देखील प्रशासनाकडून एमएमआरडीएकडे हस्तांतर करण्यात आली नसल्याची बाब समोर आल्याने या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे काम रेंगाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने पालिकेला जून महिन्यात पत्रव्यवहार केला होता. यानंतरही पालिकेने बिल्डरला बांधकाम परवानगी न दिल्याने तसेच आरक्षित जागा हस्तांतर न केल्याने एमएमआरडीएने पालिकेला दोन दिवसांपूर्वी पुन्हा पत्रव्यवहार करून जागा लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

एमएमआरडीएने या प्रकल्पाचे काम सप्टेंबर 2019 मध्ये सुरु केले. या सुमारे 13 किमी अंतराच्या प्रकल्पाचे सिव्हिल काम सध्या सुमारे 80 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाल्याचा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे. तर या मेट्रो रेल्वेच्या ट्रॅकच्या कामासह स्टेशनचे आर्किटेक्चरल फिनिशिंगचे काम, ओव्हरहेड इक्विपमेंट मास्टचे काम प्रगतीपथावर असल्याचा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.

दहिसर ते काशीगावपर्यंतचा पहिला टप्पा लवकर सुरू करण्यासाठी त्या दरम्यानच्या सर्व मेट्रो स्टेशन्सची एंट्री व एक्झिट्सची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक ठरले आहे. यातील मिरागाव स्टेशनच्या एंट्री, एक्झिटची कामे वगळता सर्व स्थानकांच्या एंट्री, एक्झिटचे काम प्रगतीपथावर असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक मेट्रो स्थानकावर चार एंट्री, एक्झिटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत असला तरी मिरागाव स्टेशनच्या एंट्री व एक्झिटसाठी जागेच्या मर्यादेमुळे एमएमआरडीएकडून या स्टेशनसाठी केवळ दोनच एंट्री, एक्झिट प्रस्तावित करण्यात आले आहेत. या स्टेशन लगतच्या उपलब्ध रिकाम्या भूखंडांमध्ये एमएमआरडीएने एंट्री, एक्झिटचे स्ट्रक्चर्स प्रस्तावित केली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT