डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर लोकप्रतिनिधींची राजवट नसल्याने त्याचा गैरफायदा घेऊन प्रशासनातील अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. परिणामी केडीएमसी हद्दीत नागरी समस्या बोकाळल्या आहेत. वाहतूक कोंडीसह बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे. कल्याण डोंबिवलीकरांच्या प्रश्नांची पालिकेकडून लवकर सोडवणूक होत नाही. अधिकारी बेताल वागत आहेत. अशा अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मंगळवारी कल्याण जिल्हा काँग्रेस समितीतर्फे केडीएमसीच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कल्याण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, पदाधिकारी राजाभाऊ पातकर, माजी नगरसेवक नवीन सिंंग, विमल ठक्कर, यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कल्याण-डोंबिवलीत स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यात येत असले तरी शहरात जागोजागी खड्डे आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. रोगराईसह वैद्यकीय आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक कोंडीने सर्वच हैराण आहेत. अनेक प्रस्तावित विकास कामे निधी अभावी रखडली आहेत. कल्याण-डोंबिवलीकर नागरी समस्यांच्या तक्रारी घेऊन आले की त्यांना आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्या शिवाय त्यांची कामे मार्गी लागत नसल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष पोटे यांनी यावेळी बोलताना केला.
भूमाफिया आणि केडीएमसीचे अधिकारी यांच्या साट्यालोट्यांमुळे डोंबिवलीतील 65 इमारतींमधील 9 हजार लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. या बेकायदा बांधकामांना जबाबदार महापालिका आणि इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.