मुंबई-गोवा महामार्गावर कामथे येथे आयशर टेम्पोने ट्रेलरला मागून धडक दिल्याने टेम्पोच्या केबिनचा चक्काचूर झाला. pudhari news network
ठाणे

Thane Accident News | उभ्या ट्रेलरला टेम्पो धडकून दोघे जागीच ठार

चिपळूण-कामथे येथे अपघात; मयत सिंधुदुर्ग-वेंगुर्ले येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कामथे हायस्कूलनजिक असलेल्या एसटी थांब्याच्या ठिकाणी उभ्या ट्रेलरला आयशर टेम्पोची मागून जोरदार धडक बसली. या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील दोन तरुणांचा दुर्दैवीरित्या जागीच मृत्यू झाला. चालकाला डुलकी आल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गुरुवार (दि.8) रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. ऋत्विक संतोष शिरोडकर (24, रा. किनलने, भटवाडी-वेंगुर्ले ) व रामचंद्र राजेंद्र शेणई (28, रा. परबवाडा वेंगुर्ले) अशी दुर्दैवीरित्या मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. हे दोघे तरुण रात्री मुंबईहून गोव्याकडे आयशर टेम्पो घेऊन चालले होते. हा टेम्पो कामथे घाट सोडल्यानंतर माटे हायस्कूलनजिक असलेल्या एसटी थांब्याच्या ठिकाणी आला असता महामार्ग सोडून थांब्याच्या ठिकाणी उभ्या असलेल्या एका ट्रेलरवर आयशरची मागून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत आयशर टेम्पोच्या ड्रायव्हर केबिनचा पूर्ण चक्काचूर झाला आणि यामध्ये हे दोन तरुण चिरडले गेले. या घटनेची माहिती मिळताच सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कामथे ग्रामस्थ व चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आयशर टेम्पोमध्ये अडकलेल्या स्थितीत असलेल्या या दोन तरुणांना शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला होता. यानंतर त्यांचे मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

अपघातात ठार झालेले तरुण

हे दोन्ही तरुण वेंगुर्ला येथील होते. नुकताच त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला होता. अशातच या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने वेंगुर्लेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी उशिरा या दोघांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आणि ते अंत्यविधीसाठी वेंगुर्ले येथे नेण्यात आले. ॠत्विक याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे. तर रामचंद्र याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. दुसर्‍याला संकटसमयी मदत करणारे म्हणून ॠत्विक व रामचंद्र परिचित होते. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

डुलकी बेतली दोघांच्या जीवावर

कामथे येथे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. या ठिकाणी एसटी बस थांबण्यासाठी माटे हायस्कूलनजिक स्वतंत्र ट्रॅक देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्य महामार्गावर हा ट्रेलर उभा नव्हता. अशाही स्थितीत मागून येणारा आयशर टेम्पो उभ्या असलेल्या ट्रेलरवर धडकला. चालकाला झोपेची डुलकी आली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT