साऊंड सिस्टिम Pudhari Photo
ठाणे

Thane News | सावधान ! डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडली तर होणार कारवाई

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू झाली असून नवरात्र उत्सवात डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी नवरात्रौत्सवात डीजेच्या आवाजावर पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाची करडी नजर राहणार आहे.

मोठ्या आवाजाच्या, ध्वनी प्रदूषण करणार्‍या साउंड सिस्टीम व डीजेचा आवाज नियमानुसार मर्यादित ठेवावा, असे निर्देश यापूर्वीच पोलिसांकडून सार्वजनिक उत्सवाच्या मंडळांना देण्यात आले आहेत. मात्र हे आदेश दिल्यानंतर देखील नियमापेक्षा जास्त आवाज असणार्‍या साउंड सिस्टीम व डीजेचा आवाज ठाण्यात घुमतोय. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणार्‍या मंडळाची नोंद प्रदूषण मंडळाचे पथक करणार असून या नोंदीचा अहवाल पोलिसांना पाठवणार आहेत. त्यानंतर पोलीस त्याबाबत कारवाई करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठाण्यात ठिकठिकाणी नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गरबा व दांडिया नृत्यात तरुणाई बेधुंद होत असतानाच काही ठिकाणी मात्र साउंड सिस्टीम व डीजेचा आवाज नियम मोडणारा ठरत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नागरी वस्तीत साउंड सिस्टीमचा 65 डेसिबलपेक्षा अधिक आवाज असू नये, असे आदेश असतानाही ठाण्यातील काही ठिकाणी या नियमांचे सर्रास उल्लंघन होते.

पोलिसांनी आयोजकांना नियम पाळण्याच्या सक्त पूर्वसूचना दिलेल्या असतानाही नवरात्र उत्सव मंडळांनी पोलिसांना न जुमानता साउंड सिस्टीमचा आवाज वाढवला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे निमय मोडणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही प्रकारचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. नवरात्रीमध्ये नियम उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी कळवले आहे.

नियम पाळण्याच्या सक्त सूचना

नवरात्र उत्सवात तरुणाईचा उत्साह पाहता या दरम्यान दिलेल्या आदेशाचा विसर पडताना दिसून येतो. मात्र डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई नवरात्रौत्सवात मशगूल होऊ न जाते. वेळ, ध्वनी प्रदूषण याबाबत ठरवलेल्या नियमांचे होणारे उल्लंघन पाहता तसेच नियम पाळण्यासाठी करण्यात आलेल्या सक्त सूचना पाहता नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT