भिवंडी : बायकोने मोबाईलवर शिवीगाळ करत माझी माहेरी बदनामी का करता, असा जाब विचारल्याच्या वादातून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या नवर्याने प्रेयसीशी संगनमत करून बायकोवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. नवर्यासोबत राहणार्या प्रेयसीसह नवर्यावर नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश शिनवार माळी (32) आणि त्याची प्रेयसी गौरी लक्ष्मण पाटील ( 20) अशी गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी नवरा सुरेश आणि 28 वर्षीय तक्रारदार महिलेचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून असून हे दोघे भिवंडी तालुक्यातील मानकोली गावात राहत आहेत. मात्र विवाह नंतर काही महिन्यातच आरोपी सुरेशचे गौरीशी प्रेमाचे सुत जुळले होते. तर दुसरीकडे तक्रारदार बायको आणि आरोपी नवरा सुरेश यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. आरोपी सुरेश हा तक्रारदार बायकोच्या आईला व बहिणीला मोबाईलवर संपर्क करून पीडित बायको बद्दल शिवीगाळ करत तिची बदनामी करीत होता. याचाच जाब विचारण्यासाठी सोमवार ( दि. 29) रोजी तक्रारदार बायकोने नवरा सुरेशला विचारताच त्याने प्रेयसी गौरीशी संगनमत करून पीडितेला शिवीगाळ करीत प्रेयसी गौरीने लोखंडी दांड्याने तिला गंभीर जखमी केले आहे. तर नवरा सुरेशने पीडित बायकोला चाकूने धमकात तिच्यावर वार करून तिला जखमी केले आहे. याप्रकरणी सुरेश, त्याच्या प्रेयसी विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.