डोंबिवली : दिल्लीत झालेल्या गणित विषयक घेण्यात आलेल्या आंंतरराष्ट्रीय असमास अबॅकस स्पर्धेत बदलापूरच्या अन्वी प्रसाद देशमुख हिने ग्रॅन्ड चॅम्पियनशिप पटकावली. 40 देशांचे स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी झाले होते. अन्वी ही कात्रप येथील आय. ई. एस. विद्यालयाची विद्यार्थीनी आहे. या स्पर्धेत अन्वीने राष्ट्रीय स्पर्धेत गट चॅम्पियनशिप, तर व्यक्तिगत स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
अन्वीला लहानपणापासून गणित आणि संख्याशास्त्राची आवड आहे. संख्याशास्त्राच्या कौशल्य खेळात ती नेहमीच आघाडीवर असते. या गोडीतून अन्वीने असमास अबॅकसचा अभ्यास सुरू केला. उपजत गणिताची आवड असल्याने तिने अल्पावधीत अबॅकस स्पर्धांमध्ये भरारी घेतली. शालेय अभ्यासात ती हुशार आहे. अथक मेहनत करण्याची तयारी, समर्पित भाव, गणित विषयाची आवड या गुणांमुळे अन्वीने हे यश संपादन केल्याचे तिच्या आई-वडिलांंनी सांगितले. या यशात मार्गदर्शक शिक्षक विधू बिजोरिया, वर्षा टकसाळे, प्रीती कदम, संजय भोईर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे अन्वीने सांगितले. गणित आणि संख्याशास्त्र विषयांच्या माध्यमातून आपण पुढील वाटचालीत संशोधन करून महत्वाचे टप्पे गाठायचे असल्याचेही अन्वीने सांगितले.