ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाच्या वतीने ह्यूस्टन जवळील रोझेनबर्ग शहरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.  pudhari news network
ठाणे

Thane News | विठू नामाचा गजर सातासमुद्रापार; ह्यूस्टन नगरी दुमदुमली

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाच्या वतीने रविवारी (दि.4) रोजी ह्यूस्टन जवळील रोझेनबर्ग शहरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात करण्यात आले. प्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान तेथील भाविकांनी विठू नामाचा गजर करत दिव्य असा भक्तिमय अनुभव घेतला.

रविवारी (दि.4) रोजी पहाटे 5 वाजता उत्सवाला वारीने सुरुवात झाली. पहाटेच 80 हून अधिक लोक विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती घेऊन पारंपरिक अश्या पवित्र वारीच्या माध्यमातून बाहेर निघाले. ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाच्या मंदिर समितीचे अध्यक्ष अभिषेक भट यांच्या नेतृत्वाखाली वारी जसजशी पुढे जात होती तसतसा सहभाग वाढताना दिसत होता. शंभराहून अधिक लोक मार्गावर विविध ठिकाणी वारीत चालू लागले. विठ्ठलाच्या नामघोषाने भरलेली वारी 14 मैलांच्या प्रवासानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास मंदिरात पोहोचली. अमेरिकेत पहिल्यांदाच अशा भव्यदिव्य वारीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात आल्यानंतर भक्तांच्या अंतःकरणातील अथांग प्रेम आणि भक्ती दर्शवणारी आरती करून वारीत चालणार्‍या वारकर्‍यांचे स्वागत करण्यात आले. वारीचे आगमन हा हृदयस्पर्शी क्षण होता. ज्याची तेथील मराठी समाज अनेक दशकांपासून वाट पाहत होता. मोरया ढोल-ताशा ग्रुपच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ढोल-ताशा आणि रिंगणाच्या दणदणाटात वारीचे स्वागत करण्यात आले आणि उत्सवाच्या वातावरणात भर पडली.

ढोल-ताशा सादरीकरणानंतर पूजेला सुरुवात झाली. दुपारी अडीचपर्यंत सर्व देवतांच्या प्राणप्रतिष्ठापनाची पूर्तता झाली. त्यानंतर भव्य महाआरती, होम हवन झाला. या उत्सवाला 600 हून अधिक भाविकांची उपस्थिती होती. उत्साही लोकसहभागामुळे या मंदिराचे उद्घाटन हा सगळ्यांसाठीच एक संस्मरणीय असा अनुभव ठरला. या मंदिरात गणपती बाप्पा, कोल्हापूरच्या महालक्ष्मीसह विठ्ठल-रुक्मिणीच्या दगडी मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. भारतातील प्रसिद्ध कारागीर शाहीर चेतन हिंगे यांनी या मूर्ती घडविल्या आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतातील पाच महत्त्वाच्या नद्यांचे पाणी आणले होते. शिवाय कोल्हापूरच्या अंबाबाईकडील कुंकूसुद्धा ह्यूस्टनमध्ये आणण्यात आले.

स्वप्न प्रत्यक्षात साकारले

मंडळातील सर्व स्वयंसेवकांच्या चमूने गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यक्रमासाठी नियोजन आणि परिश्रम घेतले. विठू माऊली, रुक्मिणी माऊली, गणपती बाप्पा आणि अंबाबाई यांच्या आशीर्वादाने हे सर्व प्रयत्न फळाला आले. एक दीर्घकाळचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले गेले आहे. या कार्यासाठी निधी उभारण्यासह समाजाशी संपर्क करण्यात आणि हे स्वप्न साकारण्यासाठी मराठी म्हणून अभिमान बाळगणार्‍या अगणित व्यक्तींनी मोलाचे योगदान दिले आहे. त्या सर्वांच्या परिश्रमाची दखल सुद्धा यावेळी घेण्यात आल्याचे ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळ वास्तू आणि मंदिर समितीचे अध्यक्ष अभिषेक भट्ट यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT