माथेरान, नेरळ (ठाणे) : नेरळ माथेरान घाट रस्त्यावर वीकेंडला होणार्या वाहतूक कोंडीतून पर्यटकांची सुटका करण्यासाठी नेरळ पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. परंतु कारवाईचे कारण न समजताच अचानक रविवारी पोलिसांनी कारवाई केल्याने टॅक्सी चालक युनियनने पोलिसांच्या विरोधातच स्ट्राइक सुरू केल्याने मधल्या मध्ये माथेरान फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे हाल झालेत. दरम्यान दुपारी तीन वाजता पोलिस प्रशासन आणि टॅक्सी युनियन मधील सुवर्णमध्य काढीत पुन्हा नेरळ माथेरान नेरळ सेवा सुरू झाल्याने पर्यटकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
माथेरान येथे मान्सून मध्ये पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.येथील हिरवी वनराई,फेसाळणारे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची शनिवार रविवार विकेंड सुट्टीला गर्दी पाहायला मिळत आहे.परतू माथेरान मध्ये येणार्या पर्यटकांच्या वाहन कोंडीमुळे पर्यटकांना पायपीट करावी लागली. माथेरान घाटात वाहतूक कोंडी होत आहे.परिणामी याचा फटका पर्यटनावर होत असून पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान घाटातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी अचानक नेरळ माथेरान चालणार्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. 30 हून अधिक कार चालकांवर केलेल्या कारवाई मुळे कुठे तरी वाहन चालकांनी देखील केवळ आमची चुकी नसून वीकेंडला पोलिस घाटात उपस्थित राहत नसल्याने पर्यटकांची वाहने ही घाटात पार्क केलेली असल्याने याचा फटका स्थानिक चालकाना बसतो त्याकडे पोलिस का लक्ष देत नाही म्हणून थेट रविवार सुटीच्या दिवशी टॅक्सी युनियन कडून वाहतूक सेवा बंद करून पोलिस ठाण्याच्या समोर 200 वाहन चालकांनी घेराव घातला. अखेर पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचना यामध्ये,वाहन चालक मद्यपान करून वाहन चालवणार नाही,शिवाय गर्दीत एकापाठोपाठ वाहने रांगेत लागतील आणि ड्रेस कोड बंधनकारक असेल म्हणून एक महिन्याची मुदत देण्यात आली यावर सुवर्ण मध्य करीत टॅक्सी युनियनने देखील सकारात्मकता दाखवत आपले आंदोलन मागे घेत पर्यटकांच्या सेवेत आपली वाहने सुरू केली.
रविवार वीकेंडला सकाळ पासून वाहन चालकांचे स्ट्राईक सुरू झाल्याने पर्यटकांचे नाहक हाल झाले.माथेरान उतरण्यासाठी पर्यटकाना चालत नेरळ यावे लागले तर माथेरान फिरण्यासाठी आलेल्या आज पर्यटकाना पायी घाट चढावा लागला. हातात सामान आणि लहान मुले खांद्यावर घेऊन ही पायपीट करावी लागली. दुपारी तीन वाजता पोलिस आणि चालकांचा गोंधळ मिटल्याने वाहन चालक पर्यटकाना घेऊन माथेरान उतरू लागले. मात्र आज दोघांच्या भांडणात पर्यटकांचा नाहक घामटा निघाला.