भाईंदर : मीरारोड पूर्व येथील सालासर इमारत ते शांती विद्या नगरी पर्यंत रस्ता व नाल्याचे सिमेंट काँक्रिटकरण दोन वर्षांपूर्वी केल्यानंतरही नाल्याचे बांधकाम पालिकेचा कायदिश नसतानाही तोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक समाजसेवक नितीन नाईक यांनी आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.
पालिकेने मीरारोड येथील सालासर इमारत ते शांती विद्यानगरी पर्यंतच्या नाल्याचे सिमेंट काँक्रीटीकरण ११ जुलै २०२३ रोजीच्या कार्यादेशाप्रमाणे एका खाजगी ठेकेदाराकडून करून घेतले. मात्र या दोन वर्षांत ठेकेदाराने अद्यापपर्यंत नाल्याचे कोणत्याही प्रकारचे बांधकाम केले नसल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे. तर पालिकेकडून कार्यादेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशातच हा नाला कोणतेही कारण नसताना अथवा त्याची अवस्था जीर्ण झाल्याने त्याची पुनर्बाधणी करा, अशी मागणी वजा तक्रार कोणीही केली नसताना तसेच पालिकेचा कोणत्याही प्रकारचा कायदिश नसताना चांगल्या अवस्थेतील नाल्याचे बांधकाम पालिकेतील एका ठेकेदाराने परस्पर तोंडल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचे नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.
तर दोन वर्षांपूर्वी काढलेल्या कार्यादेशानुसार या नाल्याचे बांधकाम अद्यापही प्रलंबित असताना त्याच्या दुरुस्तीचा फंडा समोर आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी नाईक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कायदिशाची मागणी केली असता त्यांना तो देण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या नाल्याच्या दुरुस्तीचे काम मेसर्स एन. जे. ब्रदर्स या कंपनीला देण्यात आल्याचे नाईक यांना सांगण्यात आले असले तरी मेसर्स एन जे ब्रदर्स या ठेकेदाराला पालिकेकडून वार्षिक तत्वावर लहान गटारे दुरुस्त करण्याचा ठेका दिल्याचे त्यांनी सांगितले. तर नाल्याच्या दुरुस्तीपूर्वी त्याची बांधकाम अभियंत्याकडून पाहणी अहवाल व खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जाते. मात्र या प्रकरणात नाल्याच्या बांधकामाचा कोणत्याही प्रकारचा पाहणी अहवाल व कायदिश देण्यात आला नसल्याचे नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.
नाला सुस्थितीत करण्याची मागणी
यामुळे विना कार्यदिश नाल्याचे बांधकाम तोडणाऱ्या ठेकेदारावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत कारवाई करून त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी. त्याचप्रमाणे विना कार्यादेश नाला तोडणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून तोडलेला नाला सुस्थितीत करण्यात यावा व त्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे.