डोंबिवली, सापाड (ठाणे) : लाडकी बहीण योजना बंद होणार, अशा अफवा निर्माण करून संभ्रम पसरवणे हे काम विरोधक करत आहेत. मात्र आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण येथे बोलताना दिली.
कल्याण-डोंबिवलीत आजपासून स्वच्छतेचे नवे पर्व सुरू होऊन, हे शहर राज्यातील सर्वोत्तम शहर बनवू, कल्याण-डोंबिवलीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहर स्वच्छता अभियान राबविले जात असल्याचे आयोजित कार्यक्रमामध्ये अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
या कार्यक्रमाला यावेळी भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आम. राजेश मोरे, विश्वनाथ भोईर, सुलभा गायकवाड, केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल, ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, टाटाचे सुशील कुमार आदी मान्यवर उपस्थीत होते.
कल्याण-डोंबिवलीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शहर स्वच्छता अभियान राबविले जात आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक शहराची ओळख ही त्या शहरातील स्वच्छतेवरून होते. त्यामुळे हे अभियान कल्याण-डोंबिवलीच्या स्वच्छतेचे एक नवे पर्व असून या अभियानामुळे ही दोन्ही शहरे राज्यातीलच नव्हे तर देशातील स्वच्छ शहरे म्हणून नावारूपास येतील, असेही यावेळी शिंदे म्हणाले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन, वाहतूक नियोजन, रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ रविवारी (दि.18) रोजी करण्यात आला. यावेळी बोलताना शिंदे पुढे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेसंदर्भात विरोधक विविध प्रकारच्या दररोज अफवा पसरवत आहेत. समाजात संभ्रम निर्माण करत आहे. पण लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. लाडकी बहिण योजनाही ही कधीही बंद होणार नाही. ती सुरूच राहणार आहे. कारण आमचे सरकार प्रिटिंग मिस्टेक न करणारे आणि दिलेला शब्द पाळणारे डबल इंजिन सरकार आहे. आम्ही योजना बंद करणारे नाही.
ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेतून भारताने आपली सामरिक ताकद पाकिस्तानचे कंबरडे मोडून जगाला दाखवून दिली आहे. आमच्या बहिणींचे कुंकू पुसणार्या दहशतवाद्यांचा आपण सिंदूर मोहिमेतून खात्मा केला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. टाटा कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून 7 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण मिळणार असून त्यात रोबोटिक्स, आर्टिफिशयल इंटेलिजनस आणि ड्रोन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. कल्याण-शिळ महामार्गावरील दावडी येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमीटेड संचलीत कौशल्यवर्धन केंद्र, सेंटर फॉर इन्व्हेंशन इनोव्होवेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारासह पाठपुराव्यामुळे 197 कोटी रुपयांच्या निधीतून हे केंद्र उभे राहणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीज, इतर उद्योग संघ, एमआयडीसी व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. यामाध्यमातून दरवर्षी अंदाजे 7 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्राच्या माध्यमातून अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. या ठिकाणी उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळ यांना या ठिकाणी प्रशिक्षण मिळणार. जिल्ह्यातील विद्यार्थी, तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सदर प्रकल्पाचा फायदा होणार असून त्याद्वारे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. चांगल्या दर्जाच्या नोकरीची संधी वाढविण्यासाठी उच्चस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणार्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचार्यांना पेन्शन योजनेचे धनादेश वाटप, कल्याण बदलापूर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका बाधित प्रकल्पग्रस्तांना तसेच चणढझ - 3 ए कल्याण गुड्स यार्ड उपमध्य रेल्वे प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांना सदनिका वाटप करण्यात आले. तर टिटवाळा येथील उद्यानाचे ऑनलाईन लोकार्पण, खंबाळपाडा येथे क्रिडा संकुलाचे ऑनलाईन भूमीपूजन आणि महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत पोलिस परिमंडळ 3 च्या दामिनी पथकाला 16 दुचाकी वाहनांचे वितरण आदी कार्यक्रम यावेळी पार पडले.