सापाड : योगेश गोडे
शहरातील धूळखात पडलेल्या सार्वजनिक भिंतीवर आकर्षक चित्र रेखाटून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणार्या विविध चित्रातून कल्याण- डोंबिवलीतील एमआयडीसी परिसर झगमगून गेला आहे. या कलाकृतीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे दर्शन घडवणारी चित्र कलाकारांनी रंगवून शहराच्या सौंदर्यात आणखी रंग भरल्याने ही चित्र पाहण्यासाठी कलाप्रेमींनी गर्दी जमवली आहे. त्यामुळे या चित्राच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सौंदर्यात अजूनच भर पडली असून चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण डोंबिवली शहरातील भिंतींना आकर्षक रंगात रंगवून त्यातून सामाजिक संदेश देत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्र सध्या कल्याण डोंबिवलीकरांचे आकर्षक ठरले आहे. डोंबिवली एमआयडीसीत असणार्या कंपन्यांच्या भिंतींवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळ-मातीचे थर बसले होते. तर काही ठिकाणी पान खाऊन पिचकार्या उडवण्यात आल्या होत्या. त्यामुळे या खराब भिंतींमुळे शहराच्या सौंदर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दररोज या परिसरातून ये-जा करणार्या प्रवाशांमधून देखील शहराच्या कुरूपतेच्या चर्चा रंगतांना दिसत होत्या. मात्र शहराच्या सौंदर्यात अजूनच भर पडावी यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकाच्या मदतीने या दीड-दोन किलोमीटरच्या भिंती रंगवण्यात आल्या असून महाराष्ट्राची संस्कृती या चित्रांच्या माध्यमातून रेखाटण्यात आली आहे. तर भारतीय खेळ, सण उत्सव, दैनिक खेळांसह मैदानी खेळासह महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणार्या चित्र या भिंतींवर रेखाटण्यात आली आहेत. याच रुक्ष भिंतींना बोलके करण्याचे काम कलाकारांच्या माध्यमातून केले जात आहे. शहराच्या सौंदर्यावर सर्वसामान्यांकडून टीका केली जायची. त्यामुळे अशा धूळखात पडलेल्या भिंतीवर चित्र रेखाटून त्या बोलक्या करण्यास सुरुवात झाली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारताना एक कलाकार आपली तहान-भूक विसरून रंग भरताना दिसत आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणारी शोभायात्रा हा डोंबिवली शहरातला आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्याचे प्रतीकही या भिंतीवर काढण्यात आले आहे. प्रामुख्याने स्वतंत्र काळापासून देशाच्या जडणघडणीत योगदान देणार्या महापुरुषांसह महाराष्ट्रातील सण, उत्सव, परंपरा, शहराची ओळख असणारी प्रमुख वास्तू, प्रसिद्ध खेळाडू, राजकीय व्यक्ती, स्थानिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ, निसर्ग, वास्तू, अशा विविध गोष्टींवर आधारित चित्रे रेखाटून या संकल्पनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. आतापर्यंत तब्बल पाचशेहून अधिक चित्र रेखाटून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन चित्राच्या माध्यमातून घडवण्याचा मानस असल्याचे चित्रकारांनी दैनिक पुढरीशी बोलतांना सांगितलं.