जिल्ह्याच्या आदिवासी आणि अतिदुर्गम भागात जलद आरोग्याच्या सेवा पुरविण्यासाठी दहा मोबाईल मेडिकल युनिट सुरू करण्यात येत आहेत. pudhari news network
ठाणे

Thane News | दुर्गम भागात रुग्णसेवेसाठी 38 कर्मचार्‍यांची फौज

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : जिल्ह्याच्या आदिवासी आणि अतिदुर्गम भागात जलद आरोग्याच्या सेवा पुरविण्यासाठी दहा मोबाईल मेडिकल युनिट सुरू करण्यात येत असून, या युनिटवर रुग्णांच्या सेवेसाठी 38 आरोग्य कर्मचार्‍यांना तैनात करण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व जिल्हा अरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले.

अतिदुर्गम भागात 10 मोबाईल मेडिकल युनिट

ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग डोंगर दर्‍या-खोर्‍यांचा आहे. शहापूर, मुरबाडसह ग्रामीण तालुक्यांमध्ये अनेक वाड्या-वस्त्या दुर्गम तर अतिदुर्गम ठिकाणी वसल्या आहेत. कच्चे रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या अभावामुळे अनेकदा या वाड्यांतील नागरिकांना आपत्कालीन स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचणेही मुश्किलीचे होते. यासाठी ठाणे जिल्ह्यात अदिवासी व अतिदुर्गम भागात 10 मोबाईल मेडिकल युनिट सुरू करण्यात येत आहेत. यापैकी शहापूर तालुक्यात एक युनिट सुरू असून, 9 युनिट 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे.

या उपक्रमातंर्गत ठाणे जिल्ह्यात 81 दुर्गम अणि अतिदुर्गम भागामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रकल्पा अंतर्गत दुर्गम अणि अतिदुर्गम भागातील नागरिकांकरिता 18 प्रकारची औषधे व 12 प्रकारच्या प्रयोगशाळा तपासणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच गावामध्ये आरसीएच, लसीकरण, सिकलसेल रोग, औषधे आणि निदान एनसीडी इत्यादी सर्व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक मोबाईल मेडिकल युनिटसाठी एक वैद्यकीय अधिकारी, जीएनएम, लॅब टेक्निशियन व फोर्मासिस्ट असे एकूण 4 अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी तसेच दुर्गम भागातील नागरिकांना जलद आरोग्याच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी 10 मोबाईल मेडिकल युनिट सुरू करण्यात येत असून 38 आरोग्य कर्मचार्‍यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT