मिरा-भाईंदर महापालिका ई-बस file photo
ठाणे

Thane News | परिवहन सेवेत 4 एसी ई-बस दाखल

पुढारी वृत्तसेवा
भाईंदर : राजू काळे

मिरा-भाईंदर महापालिकेने केंद्र शासनाच्या 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीतून 57 पर्यावरण पूरक ई-बस खरेदी करण्याचा निर्णय गतवर्षी घेतला. त्यापैकी आत्तापर्यंत 32 मिडी ई-बस सेवेत दाखल झाल्यानंतर अलिकडेच 4 एसी ई-बस सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या प्रवासी सेवेसाठी रस्त्यावर आणण्यात येणार असून ऑगस्ट महिन्याअखेर आणखी 6 एसी ई-बस सेवेत दाखल होणार आहेत.

त्यामुळे परिवहन सेवेतील एसी बसची संख्या वाढून प्रवाशांना गारेगार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या बसमुळे सेवेतील ई-बसची संख्या 36 इतकी होणार आहे. यापूर्वी सेवेत 32 मिडी ई-बस सेवेत दाखल झाल्या आहेत. सध्या इंधनावर चालणार्‍या बसची संख्या 74 इतकी होती. त्यातील 57 बस प्रवासी सेवा देत असून उर्वरीत 17 बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र या 17 बसची उणीव 32 मिडी ई-बस भरून काढत असल्याने सध्या प्रवासी सेवा देणार्‍या बसची संख्या 89 इतकी झाली आहे. इंधनावर चालणार्‍या 3 एसी बसपैकी 2 बसच प्रवासी सेवा देत असून त्यात नवीन 4 एसी ई-बस ची भर पडल्याने एसी बसची संख्या 6 इतकी झाली आहे. तर ऑगस्ट महिन्याअखेर आणखी 6 एसी ई-बस सेवेत दाखल होणार असल्याने प्रवाशांना गारेगार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. सेवेत दाखल झालेल्या 4 एसी ई-बसची नोंदणी नुकतीच झाली असून त्यांच्या नंबर प्लेटची प्रतिक्षा परिवहन विभागाला लागून राहिली आहे.

या नंबर प्लेट प्राप्त होताच त्या बस ठाणे मार्गावर सुरु केल्या जाणार आहेत. सध्या या मार्गावर इंधनावर चालणार्‍या 2 एसी बस प्रवासी सेवा देत असून त्यांची संख्या अत्यंत अपुरी ठरत आहे. या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असल्याने प्रवासी सेवेत दाखल होणार्‍या 4 एसी ई-बस सुद्धा याच मार्गावर सुरु केल्या जाणार आहेत. तर महिन्याअखेर सेवेत दाखल होणार्‍या आणखी 6 एसी ई-बस ठाण्यासह अंधेरी दरम्यान सुरु केल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालिकेला केंद्र शासनाच्या 15 व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या एनकॅप (नॅशनल क्लिन एअर प्रोग्रॅम) योजनेंतर्गत सुमारे 80 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यातून पालिकेने पर्यावरण पूरक ठरणारे साहित्य खरेदी करून त्यापैकी 28 कोटी 15 लाखांच्या निधीतून 57 ई-बस खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाकडून गतवर्षी घेण्यात आला. त्याचा ठेका मेसर्स पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. या ई-बस निर्मिती करणार्‍या कंपनीलाच देण्यात आला आहे. त्यात 32 मिडी, 10 एसी व 15 नॉन एसी अशा एकूण 57 ई-बसचा समावेश असून मिडी व्यतिरीक्त उर्वरीत सर्व बस स्टँडर्ड आकारमानाच्या आहेत. प्रशासनाने ई-बस खरेदीच्या निविदेत नमूद केल्याप्रमाणे ई-बस खरेदीची सुमारे निम्मी रक्कम मेसर्स पिनॅकल मोबिलिटी सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीकडून खर्च केली जात आहे. पालिकेकडून या ई-बस जीसीसी (ग्रॉस कोस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्त्वावर चालविण्यात येत असून या तत्वानुसार पालिका प्रवासी तिकिटांचे सर्व शुल्क वसूल करून त्यातून वाहक व तिकीट निरीक्षकांचे वेतन अदा करीत आहे.

प्रवासी संख्येत मोठी वाढ होणार

पालिकेकडून ई-बसच्या प्रवासी तिकीट शुल्काच्या संकलनासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे तर ठेकेदाराला ई-बस चालविण्यासाठी पालिका प्रत्येक नॉन एसी मिडी बसमागे 46 रुपये, स्टँडर्ड नॉन एसी बसमागे 54 रुपये व स्टँडर्ड एसी बसमागे 55 रुपये प्रती किलोमीटर दर अदा करणार आहे. ठेकेदार, पालिकेकडून प्राप्त होणार्‍या रक्कमेतून ई-बसच्या देखभाल, दुरुस्तीसह चालकांचे वेतन, वीज वापर व इंधन आदींचा खर्च करणार आहे. हा खर्च सुसह्य होण्यासाठी बसच्या अंतर्गत व बाह्य जाहिरातीचे शुल्क वसूल करण्यासाठी ठेकेदाराला 12 वर्षांचे कंत्राट देण्यात आले आहे. सध्याच्या बस सेवेद्वारे प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या 90 हजारांवर गेली असून सेवेत नवीन ई-बस दाखल झाल्यास प्रवासी संख्येत मोठी वाढ होण्यासह पालिकेच्या उत्पन्नात देखील मोठी वाढ होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT