ठाणे

Thane News : ठाणे जिल्ह्यात ११ लाखांचे आंबे, साडेचार लाखांचा गुटखा जप्त; ३७ जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ३० आणि ३१ मे रोजी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह विविध भागांत अचानक धाडी टाकल्या. या कारवाईत ११ लाख १२ हजार ८५० रुपये किमतीचे आंबे आणि ४ लाख ७४ हजार ४०७ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून, एकूण ३७ जणांना अटक करण्यात आली आहे.

इथिलिन स्प्रेचा चुकीचा वापर

उन्हाळ्यात आंब्याची मागणी वाढते, याचा गैरफायदा घेत काही व्यापारी आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी चुकीच्या पद्धतींचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने आंबे पिकवण्यासाठी थेट इथिलिन स्प्रेचा वापर करणाऱ्या तीन मोठ्या प्रतिष्ठानांवर कारवाई केली आहे. या कारवाईत ३,४५३ किलो आंब्याचा साठा जप्त केला आहे.

फळे पिकवण्यासाठी थेट फळांवर इथिलिन स्प्रे मारण्यास सक्त मनाई आहे. व्यापाऱ्यांनी नियमानुसार सुरक्षित अशा 'इथिलिन गॅस चेंबर'चा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, तपासणीत अनेक व्यापारी नियमांचे उल्लंघन करून थेट फळांवर स्प्रे मारताना रंगेहात पकडले गेले. जप्त केलेल्या आंब्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवालानुसार पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. सुदैवाने, या तपासणीत कॅल्शियम कार्बाइडसारख्या घातक रसायनाचा वापर कुठेही आढळून आलेला नाही.

प्रतिबंधित तंबाखूविरोधात कारवाई

जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून २९ ते ३१ मे या कालावधीत गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांविरोधातही व्यापक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत एकूण ३६ प्रतिष्ठानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले असून ३७ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या ३१ प्रतिष्ठानांना सील ठोकण्यात आले आहे.

प्रशासनाचा इशारा आणि नागरिकांना आवाहन

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर व्यापाऱ्यांविरोधातील ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांसाठी टोल फ्री क्रमांक

प्रतिबंधित आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या निर्मूलनासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. तक्रार नोंदवण्यासाठी किंवा गैरप्रकाराची माहिती देण्यासाठी १८०० २२ २३६५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिक आपली तक्रार लेखी स्वरूपात 'सह आयुक्त (कोकण विभाग), अन्न व औषध प्रशासन कार्यालय, वरदान एमआयडीसी बिल्डिंग, तळमजला, रोड नंबर १६, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम) - ४००६०४' येथे करू शकतात, असे आवाहन कोकण विभागाचे सहआयुक्त (अन्न) पराग नलावडे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT