Pudhari
ठाणे

Thane News : कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत ठाणे जिल्ह्यातील १० हजार शेतकरी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राज्यात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'साठी ठाणे जिल्ह्यातील १८ हजार ६८ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांपैकी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत १० हजार ९६२ शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमुक्ती मिळणार आहे.

राज्यात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने'चे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची महत्तम मर्यादा ठेवून कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे. त्याअनुषंगाने ठाणे जिल्ह्यातून सहकार व बँक यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणावर शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत १६ हजार ८३६ आणि राष्ट्रीयकृत बँकांमार्फत १ हजार २३२ अशा एकूण १८ हजार ६८ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात आली आहे. अपलोड केलेल्या खात्यांपैकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० हजार ५२५ आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या ४३७ अशा एकूण १० हजार ९६२ खातेदार शेतकऱ्यांची पहिली यादी बँकांकडे प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेल्या खात्यांची 'आपले सरकार' / 'महा ई-सेवा केंद्र' तसेच बँकेच्या शाखा स्तरावर आधार प्रमाणीकरणाची (Aadhaar e-KYC) प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आजपर्यंत १० हजार ९६२ खात्यांपैकी ७ हजार ३६८ खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व व्यापारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा अग्रणी प्रबंधक यांना आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच, जिल्ह्यातील सर्व 'आपले सरकार' व 'महा ई-सेवा केंद्रांवर' आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू असून, कोणत्याही शेतकऱ्याकडून आधार प्रमाणीकरण करताना कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी साधारणपणे १५ ऑगस्टनंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर थकित कर्जाची रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार असून, यामुळे त्यांना चालू खरीप हंगामामध्ये पुन्हा नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे कार्यालयामार्फत सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, शासनाकडून कर्जमुक्तीसाठी पात्र सभासदांच्या याद्या संबंधित बँक शाखा, सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय तसेच तलाठी कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत येथील आपले सरकार सेवा केंद्रात भेट देऊन बायोमॅट्रिक प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरणात काही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित सेवा सहकारी सोसायटीचे गटसचिव किंवा बँक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप 'ॲग्रीस्टॅक' नोंदणी करून घेतलेली नाही, त्यांनी त्वरित नोंदणी करून घ्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT