अंबरनाथ : शहराच्या पूर्व भागातील बी केबिन परिसरात गुरुवारी रात्री वायुगळतीने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. ही वायु गळती मोरीवली एमआयडीसी मधील नीककेम प्रोडक्ट या रासायनिक कंपनीतील असल्याचे समोर आल्याने या कंपनीला तात्काळ काम बंद चे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. या कारवाईसाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पुढाकार घेतला.
अंबरनाथमधील मोरीवली एमआयडीसीतील नीककेम प्रोडक्ट या रासायनिक कंपनीतील एका कामगारांच्या चुकीने रसायनांनी भरलेले आठ ड्रम उघडे राहिले होते. त्यातूनच झालेल्या गॅस गळतीत ने अंबरनाथ पूर्व अंबरनाथ पूर्व भागात रसायनांच्या दाट धुराचे लोट पसरल्याने हजारो रहिवाशांची एकच धावपळ उडाली होती. अखेर गुरुवारी (दि.12) रात्री उशिरा एमपीसीबी, अग्निशमन दल व इतर यंत्रणांनी कंपनीत धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. शुक्रवारी (दि.13) या कंपनीला कामबंदचे आदेश देऊन एमपीसीबी या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले. मी अंबरनाथकरांना शब्द देतो, काळजी करू नका मी कणखरपणे तुमच्या पाठीशी आहे. मोरीवली येथील, विनाप्रक्रिया प्रदूषित कचरा आणि वायू बाहेर सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी, निककेम प्रोडक्ट्स कंपनी बंद पाडू. अशा आशयाची पोस्ट आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी करून नागरिकांना दिलासा दिला.