ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, एकीकडे शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन फिरणारे पंतप्रधान जनतेला धडे देत आहेत, अशी टीका करत या आवाहनाची अंमलबजावणी सर्वात आधी महापौर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केली आहे. या मागणीसाठी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली 'बैलगाडी मोर्चा' काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी महापौर शर्मिला पिंपलोळकर यांना निवेदन देऊन, खासगी गाड्यांऐवजी टीएमटी बसचा वापर करावा, असे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी यांनी परदेशी चलन वाचवण्यासाठी भारतीयांना जे उपाय सुचवले आहेत, ते म्हणजे "भीक नको, पण कुत्रं आवर" अशा पद्धतीचे आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गणेशवाडी ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय अशी रॅली काढली. या रॅलीत डॉ. जितेंद्र आव्हाड चक्क घोड्यावर बसून सहभागी झाले होते. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष मनीषा भगत, युवक अध्यक्ष अभिजीत पवार आणि कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी बैलगाडीतून महापालिका मुख्यालय गाठले.
या रॅलीमध्ये 'घरात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा', 'वाह रे मोदी तेरा खेल... महंगा हुआ तेल', 'मोदी फिरतात परदेशी... जनता राहणार उपाशी' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. महापालिकेसमोर रॅलीचा समारोप झाला.
यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, "देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. बंगालच्या निवडणुका संपताच आता पेट्रोल ३० रुपयांनी महाग करायला हे सरकार मागे-पुढे पाहणार नाही. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार असतील, तर सरकारने घोडा, बैल, म्हैस स्वस्त करून विकावेत आणि जनतेने त्यावर बसून 'जय मोदी' म्हणत प्रवास करावा का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मध्यमवर्गीयांच्या अडचणीच्या काळातील आधार असलेल्या सोने खरेदीवरही निर्बंध आणले जात आहेत, ज्यामुळे लाखो लोक बेरोजगार होतील. मंत्र्यांच्या ६०-६० गाड्यांचे ताफे फिरत असताना जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले जात आहे," अशी टीकाही त्यांनी केली.
या आंदोलनात कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ (शानू) पठाण, गटनेता अभिजीत पवार, महिला अध्यक्ष मनीषा भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.