ठाणे : अक्षय आंब्रे
नवरात्रीचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून, संपूर्ण शहरात सणासुदीचे एक वेगळेच चैतन्य आणि खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. सणांच्या या मंगलमयी वातावरणात ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांच्या गर्दीसोबतच एका अत्यंत सकारात्मक आणि स्वाभिमानी बाजाराने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शहापूर, कर्जत आणि पालघर यांसारख्या ग्रामीण भागांतून स्वतःच्या शेतात राबणारे कष्टकरी शेतकरी आपला अस्सल शेतमाल घेऊन थेट ठाण्यात दाखल होत आहेत. त्यांच्या या कष्टामुळे ठाणेकरांची सणासुदीची सकाळ ताजी, आरोग्यदायी आणि आनंदी होत आहे.
या बाजाराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारा भाजीपाला थेट शेतातून आलेला आणि ग्राहकांचे मन तृप्त करणारा असतो. रस्त्यावर मांडलेल्या पांढऱ्या कापडावर आणि आजूबाजूला पाहिल्यास, लांब व हिरवीगार भेंडी, ताजी शेवग्याची शेंग, चवदार घेवडा, रताळी, कोथिंबीर आणि भाजीसाठी कापून ठेवलेल्या पिवळ्याधमक भोपळ्याच्या फोडी प्रामुख्याने लक्ष वेधून घेतात.
यासोबतच ग्रामीण भागाची ओळख असणारी कडू-गोड कारली, ताजी शिराळी, कुरकुरीत काकडी आणि आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असणाऱ्या विविध रानभाज्या देखील येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नवरात्रीच्या आगमनानिमित्त व पूजेसाठी लागणारी लाल जास्वंदाची फुलेही बाजारात विक्रीस ठेवलेली दिसत आहेत. ग्रामीण भागातील महिला मोठ्या आपुलकीने भाजी नीट करून ग्राहकांसाठी पिशव्या तयार करताना दिसतात, तर पुरुष शेतकरी ग्राहकांना रास्त भावात भाजी निवडून देण्यात मग्न आहेत.
रात्रीचा संघर्ष, पहाटेचा उत्साह
आपल्या शेतात कष्टाने पिकवलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा आणि सणासुदीच्या दिवसांत कुटुंबाला हातभार लागावा, यासाठी या ग्रामीण शेतकऱ्यांचा उत्साह थक्क करणारा आहे. रात्री किंवा पहाटेच्या पहिल्या लोकल ट्रेनने भाजीचे जड गाठोडे डोक्यावर घेऊन हे अन्नदाते ठाणे स्टेशन गाठतात. कोणत्याही मोठ्या दुकानाचा झगमगाट किंवा कृत्रिम थाट नसताना, रस्त्याच्या कडेला जमिनीवर साधेपणाने पांढरा कापड अंथरून हे शेतकरी अत्यंत आत्मविश्वासाने आणि हसतमुखाने आपला व्यवसाय करत आहेत.
कष्टाचा आदर करणारी सकारात्मकता
ठाणे स्टेशनबाहेरील हा बाजार शहरी ग्राहकांना थेट ग्रामीण संस्कृतीशी आणि मातीशी जोडणारा जिव्हाळ्याचा पूल ठरत आहे. अनेक मैलांचा प्रवास करून, कोणत्याही परिस्थितीची पर्वा न करता स्वाभिमानाने जगणाऱ्या या शेतकऱ्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. नवरात्रीच्या या शुभकाळात ठाणेकरांनी या स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्यांच्या कष्टाला पाठबळ देणे, हीच या सणांची खरी सकारात्मक बाजू ठरेल.
मॉल्स किंवा मोठ्या दुकानामधील भाज्यांपेक्षा या भाज्या चवीला अत्यंत उत्तम असतात. यात कोणतीही रासायनिक खते किंवा औषधे नसतात. ही पूर्णपणे नॅचरल आणि ऑरगॅनिक भाजी असते, जी आरोग्यासाठीही उत्तम आहे. थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळतो आणि आपल्यालाही ताज्या हवेतील अस्सल गावठी चव चाखायला मिळते. म्हणूनच आम्ही नेहमी या कष्टकऱ्यांना प्राधान्य देतो.सचिन म्हाडसे, ठाणेकर ग्राहक