संतोष दवणे
किन्हवली : 2012 पासून वनाची मंजुरी व निधीचा तुटवडा या कारणास्तव रखडलेल्या शहापूर तालुक्यातील सावरोली(सो) या ग्रामपंचायत क्षेत्रामधील नामपाडा लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे अखेर दूर झाले असून नव्या प्रशासकीय व आर्थिक मान्यतेनंतर सुमारे 27 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून 2025 च्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, भातसा प्रकल्प वसाहत शहापूर यांनी दिली आहे.
सावरोली जवळील नानी नदीच्या कुतरकुंड डोहाजवळ 2009 साली कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे (उर्वरित महाराष्ट्र प्रदेश ) यांच्या अंतर्गत नामपाडा लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला सुुरुवात करण्यात आली होती. मात्र प्रकल्पासाठी लागणारी वनविभागाची 38.98 हेक्टर वनजमीन हस्तांतरित करून त्याची केंद्रीय वनविभागाकडून अंतिम मंजुरी न घेताच काम सुरू केल्याने वनखात्याने सदरचे काम बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे 2012 पासून नामपाडा कुतरकुंड प्रकल्प लाल फितीत अडकला होता. या प्रकल्पास लागणाऱ्या वनजमिनीच्या बदल्यात मौजे वाकला, ता. वैजापूर,जि. औरंगाबाद येथे सर्वे क्र.641 मधील 10.20 हेक्टर व मौजे साजे, ता. माणगाव, जि. रायगड येथे सर्वे क्र.92 आणि 100 मधील 28.78 हेक्टर जमीन वनविभागाला वर्ग करण्यात आली होती.
अकरा वर्षे संघर्ष केल्यानंतर वनाने संबंधित वनजमिन हस्तांतरणास अंतिम मंजुरी दिल्यानंतर नामपाडा प्रकल्पासाठी आपटे ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वे क्र.273, 205/1 मधील 31.08 हेक्टर व सावरोली(सो) ग्रामपंचायत क्षेत्रातील 324, 52, 64, 73, 71, 36, 50, 78, 101/ए, 15 या सर्वे क्रमांकांतील 7.90 हेक्टर राखीव व संवर्धित वनजमिन नामपाडा प्रकल्पाला वर्ग केली आहे.