डोंबिवली : जिल्ह्यात तायक्वांदोच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणारे, तसेच खेळाडूंना दहावी आणि बारावीमध्ये सवलतीचे गुण मिळावेत ही मागणी लावून धरणारे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव तथा भारतीय तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेवराव शिरगावकर यांच्यावर कॉमनवेल्थ तायक्वांदो युनियनच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदासाठी शिरगावकर यांची एक मताने निवड करण्यात आली आहे.
साऊथ कोरिया येथे नुकतीच कॉमनवेल्थ तायक्वांदो युनियनची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जगभरातील अनेक देशांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यात भारताकडून नामदेवराव शिरगावकर हे सहभागी झाले होते. यावेळी कॉमनवेल्थ तायक्वांदो युनियनच्या उपाध्यक्षपदी नामदेवराव शिरगावकर निवडून आले. इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष असलेल्या नामदेवराव यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत भारताच्या पॅरा ऑलिम्पिक येथे महिला खेळाडूंची दोन वेळा निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या साऊथ कोरिया येथील जुनिअर वर्ल्ड तायक्वांदो क्युरोगी चॅम्पियनशिपमध्ये खेळाडूंनी भारताला दोन कांस्य पदक मिळवून दिली.
तायक्वांदो युनियनचे नवनिर्वाचित महासचिव गफार पठाण यांना मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल येथे सन्मानित करण्यात आले. मुंबई उपनगर तायक्वांदो असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभासाठी शिवसेना नेते तथा खासदार रविंद्र वायकर सपत्नीक उपस्थित होते. तायक्वांदो प्रशिक्षका ज्योती हंकारे, जयेश वेल्लाळ यांच्यासह असीम सिंग सोधी, राजन सिंग उपस्थितीत होते. या कार्यक्रमाला मुंबई उपनगरातील 50 अकॅडमींची उपस्थिती लाभली.