नाते (ठाणे) : नाते, ता. महाड येथील ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केल्याच्या प्रकरणाने महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावीत अभिजीत महेश अंबावले (वय २४, रा. नाते, महाड) या आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) दुपारी लीलावती बलकवडे आपल्या शेतातील वाड्यावर गेल्या असताना त्यांचा एकटेपणाचा फायदा घेत कोणा अज्ञात व्यक्तीने गळा दाबून हत्या करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच मोबाईल फोन घेत पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच महाड
शहर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, महाड तालुका उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रमेश तडवी आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. आणि अभिजीत महेश अंबावले (वय २४, रा. नाते, महाड) या आरोपीस २४ तासांच्या आत ताब्यात घेत या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे. या हत्येच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी अल्पावधीतच आरोपीला पकडल्यामुळे पोलिसांच्या कृतीने समाधान व्यक्त केले.