ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात अर्बन रेस्टरूम बांधण्यात आले आहे. pudhari news network
ठाणे

Thane Municipality News | ठाणे महापालिकेचे नऊ कोटी रुपये पाण्यात

पुढारी वृत्तसेवा
ठाणे : प्रवीण सोनावणे

सार्वजनिक ठिकाणी वावरतांना महिलांच्या सुविधेसाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात अर्बन रेस्टरूम बांधण्यात आले. या अर्बन रेस्टरूममध्ये स्तनपान, शौचालय, कपडे बदलण्यासाठी जागा अशा अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात ही अर्बन रेस्टरूम सुरूच झाली नाहीत. या रेस्टरूमचे काय झाले याची माहिती देखील पालिकेने घेतलेली नसून काही ठिकाणी तर या रेस्टरूमचे अक्षरशः सांगाडे उरले आहेत. तर काही ठिकाणचे रेस्टरूम गायबच करण्यात आले आहेत. तब्बल 9 कोटी रुपये खर्च करून हे रेस्टरूम बांधण्यात आले असून प्रत्यक्षात रेस्टरूम सुरूच न झाल्यामुळे पालिकेचे 9 कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.

ठाण्यात शहरीकरणाचा रेटा जास्त असून या ठिकाणी राहायला येणार्‍या नागरिकांची संख्या देखील जास्त आहे. ठाण्यात नोकरदार महिलांची संख्या देखील मोठी आहे. शहरात शौचालयांची संख्या जास्त असली तरी पुरुष आणि महिलांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालयांमध्ये महिलांना जाण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे खास महिलांसाठी अर्बन रेस्टरूमची संकल्पना ठाणे महापालिकेच्या वतीने राबवण्यात आली. यामध्ये शहराच्या विविध ठिकाणी ही अर्बन रेस्टरूम बांधण्यात आली. ज्यामध्ये महिलांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकामाच्या विभागाकडून 12 ठिकाणी ही रेस्टरूम बांधण्यात आली. त्यानंतर समाज विकास विभागाकडून ही रेस्टरूम चालवण्यासाठी निविदा काढण्यात येणार होत्या.

मात्र प्रत्यक्षात यातील केवळ दोनच रेस्टरूम सुरू झाली. इतर रेस्टरूम सुरूच झाली नाहीत. याविरोधात भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी देखील आवाज उठवला होता. शहरात प्रत्यक्षात किती रेस्टरूम सुरू आहेत याची पोलखोलच त्यांनी केली होती. त्यावेळी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी एका आठवड्यात ही रेस्टरूम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यानंतर या अर्बन रेस्टरूमचे नक्की काय झाले याची साधी माहिती घेण्याचे कष्ट देखील पालिका प्रशासनाने घेतलेले नाहीत. अर्बन रेस्टरूम विषयी प्रत्यक्षात जाऊन आढावा घेण्यात आल्यानंतर कळवा या ठिकाणी बांधण्यात आलेल्या रेस्टरूमचा अक्षरशः सांगाडा उरला आहे. मानपाडा येथील रेस्टरूम तर गायबच करण्यात आले आहेत. इतर रेस्टरूमची अवस्था देखील बिकट असून या योजनेची अंमलबजावणी करायची नव्हती तर या योजनेसाठी पालिकेने 9 कोटी रुपये का खर्च केले? असा प्रश्न आता समोर आला आहे.

स्मार्ट सिटीचाही घोळ...

स्मार्टसिटीच्या माध्यमातूनही अर्बन रेस्टरूम उभारण्यात आले होते. मात्र या रेस्टरूमची अवस्था बिकट आहे. ठाण्यातील सेंट जॉन शाळेच्या बाजूच्या अर्बन रेस्टरूममध्ये तर केअर टेकरने आपला संसार थाटला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातही असे रेस्टरूम सुरू केले असून मोक्याच्या जागेवर हे रेस्टरूम असताना पुरेशी जनजागृती न केल्याने येथे एकही महिला येत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खर्च केलेले पैसेही वायाच गेले आहेत.

ठाणे महापालिकेच्या आणि स्मार्ट सिटी अशा दोघांच्या माध्यमातून हे अर्बन रेस्टरूम बांधण्यात आले होते. मात्र यातील केवळ दोन रेस्टरूम त्यावेळी सुरू करण्यात आले. याविरोधात मी आंदोलन करूनही सर्व रेस्टरूम सुरू करण्याची मागणी केली होती. पालिकेकडून अनेक योजना आखल्या जातात, मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात नसल्याने पालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत. याविरोधात मी पुन्हा आवाज उठवणार आहे.
मृणाल पेंडसे, माजी नगरसेविका, भाजप.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT