TMC tender controversy pudhari photo
ठाणे

TMC tender controversy : टेंडर प्रक्रियेवरील वाद चिघळला

ठाणे महापालिकेत अभियंत्यांचे काम बंद आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे महापालिकेतील टेंडर प्रक्रियेवरून नगरसेवक आणि महापालिका अभियंता आणि अधिकाऱ्यांमधील वाद आता चिघळला असून, त्याचे पडसाद थेट महापालिकेच्या कामकाजावर उमटले आहेत. कार्यकारी अभियंता रणधीर राणे यांच्याबाबत नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी केलेल्या गंभीर आरोपांचा तसेच ‘चोर’ आणि ‘भ्रष्ट अधिकारी’ असा केलेल्या उल्लेखाचा निषेध नोंदवत महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता लेखणी बंद आंदोलन सुरू केले.

यासंदर्भात त्यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना देखील निवेदन दिले तर खासदार नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमवेत देखील अभियंत्याची महत्वाची बैठक झाली.

रणधीर राणे हे वर्तकनगर प्रभाग समितीतील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी टेंडर प्रक्रियेवरून राणे आणि शिवसेना नगरसेवक राजेंद्र फाटक यांच्यात वाद निर्माण झाला होता.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत टेंडरला विरोध झालेला असतानाही प्रशासनाने टेंडर खुले केल्याचा आरोप करत फाटक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

या टेंडर प्रक्रियेत ‘मॅच फिक्सिंग’ अथवा भागीदारी झाल्याचा आरोप फाटक यांनी नगर अभियंता आणि कार्यकारी अभियंता रणधीर राणे यांच्यावर केला होता. संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती. काही टेंडरच्या संदर्भात पाच टक्के कमिशनची कथित मागणी झाल्याचा आरोपही करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती.

दरम्यान, राणे यांनी हे आरोप फेटाळून लावत आपण नियमानुसारच कामकाज केल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, फाटक यांनी महापालिका कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांवर केलेली टीका आणि ‘चोर’, ‘भ्रष्ट अधिकारी’ असा केलेला उल्लेख अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे या वक्तव्याच्या निषेधार्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येत लेखणी बंद आंदोलनाचा निर्णय घेतला.

मंगळवारी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची भेट घेऊन आपले निवेदन सादर केले.

अधिकाऱ्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरली जाऊ नये, तसेच संबंधित प्रकरणात प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आयुक्तांना निवेदन...

अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनाही निवेदन देण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडण्याचा निर्णयही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. टेंडर प्रक्रियेवरील आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अधिकारी-कर्मचारी विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष निर्माण झाल्याने या प्रकरणाकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT