ठाणे : ठाणे महापालिकेवर सलग 30 वर्ष शिवसेना भगवा फडकला असून कोण महापौर होणार हे 22 जानेवारीला पडणाऱ्या आरक्षणानंतर स्पष्ट होईल. खुले प्रवर्ग, ओबीसी प्रवर्ग आणि महिला आरक्षण पडल्याने जर अनुसूचित जमातीसाठी महापौरपद आरक्षित झाल्यास पहिल्यांदा निवडून येणाऱ्या सुलेखा चव्हाण अथवा विक्रांत तांडेल यांची वर्णी लागणार हे निश्चित आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना- भाजप महायुतीचे 103 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे 75 नगरसेवक आणि भाजपचे 28 नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेतील एसटी प्रवर्गातून प्रभाग एकमधून विक्रांत तांडेल आणि प्रभाग पाच मधून सुलेखा चव्हाण ह्या विजयी झाल्या आहेत. तर प्रभाग दोनमधून भाजपच्या कमल चौधरी विजयी झाल्या आहेत. स्पर्धक नसल्याने चव्हाण आणि तांडेल यांचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे दोन्ही नगरसेवक पहिल्यांदा महापालिकेची पायरी चढणार आहेत. जर एसटी प्रवर्गासाठी आरक्षण पडले तर दोघांपैकी एकाला लॉटरी लागणार आहे. हे दोन्ही नगरसेवक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ओवळा माजिवडा प्रभाग समितीमधील आहेत. खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाल्यास चुरस होणार आहे.
शिवसेनेचे सचिव आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास सहकारी राम रेपाळे, जेष्ठ नगरसेवक संजय भोईर, जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक आदी दावेदार आहेत. ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपची शिवसेना शिंदे गटाशी युती न होता स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका आमदार संजय केळकर यांची होती. मात्र प्रदेश स्तरावर ज्येष्ठ नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने ठाण्यात युती धर्म पाळत निवडणूक लढवली. यासाठी निवडणूक प्रमुख म्हणून आमदार संजय केळकर आणि निवडणूक निरीक्षक म्हणून निरंजन डावखरे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.
आमदार केळकर यांच्या ठाणे विधानसभा मतदार संघात महायुतीचे 35 पैकी 31 उमेदवार निवडून आले. त्यापैकी 21 नगरसेवक भाजपचे आहेत. उर्वरित नगरसेवक कोपरी पाचपाखाडी , ओवळा माजिवडा आणि कल्याण ग्रामीण मतदार संघातील आहेत. विशेष म्हणजे प्रभाग एकमधून अनिता ठाकूर आणि प्रभाग 29 मधून शीतल पाटील ह्या निवडून आल्या आहेत. या दोन्ही मतदार संघातून पहिल्यांदा कमळ फुलले असल्याने आमदार डावखरे यांनी बॅनरबाजी लक्षवेधी ठरत शिवसेनेला डिवचल्याचे बोलले जात आहे. एकूणच भाजपचे केवळ 4 नगसेवकच वाढले नाहीत तर पक्षाला झालेले मतदानही लक्षणीय वाढले. याबाबत केळकर आणि डावखरे यांनी भाजपला वाढत असलेला जनाधार आणि यश पक्ष कार्यकर्त्यांसाठी आणि पुढील पिढीसाठी फायदेशीरच ठरणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.
ठाणे महापालिका निवडणुकीत महायुती झाली असली तरी भारतीय जनता पार्टीने शीळ ते कासारवडवलीपर्यंत सर्व भागात नगरसेवक निवडून आणल्याने शीळ ते वडवली भाजपा वाढवली अशा आशयाचे बॅनर्स भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या कार्यकर्त्याने महापालिका हद्दीत लावून लक्ष वेधले आहे. तर पालिका निवडणुकीत भाजपाने कमी जागा लढवत तब्बल 74 टक्के स्ट्राइक रेट ठेवून 38पैकी 28 नगरसेवक निवडून आणल्याबद्दल निवडणूक प्रमुख आमदार संजय केळकर आणि निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे यांचे पक्ष वर्तुळात कौतुक होत आहे.