ठाणे : आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीचा सर्वाधिक फटका हा संभाव्य इच्छुक पुरुष उमेदवारांना बसला आहे. एकूण 33 प्रभागांत खुल्या वर्गातील 11 प्रभाग वगळता उर्वरित 22 प्रभागात प्रत्येक एकाच पुरुष उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे अनेक दिग्गज माजी नगरसेवक तसेच पहिल्यादांच निवडणुकीत आपले नशीब अजमावण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांचा या आरक्षण सोडतीमुळे हिरमोड झाला आहे.
ठाणे महापालिकेची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली असून या आरक्षण सोडती मध्ये सर्वाधिक फटका खुल्या वर्गातील पुरुषांना बसला असून 11 प्रभाग वगळता इतर प्रभागात खुल्या वर्गातील फक्त एकच पुरुष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकणार आहे. त्यामुळे या प्रभागातील तिकीट वाटप करताना राजकीय पक्षांच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महापालिकेत 131नगरसेवकांचे 33प्रभाग असून यामध्ये 66 जागा या महिलांकरिता आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
35 जागा या इतर मागासवर्गीय करिता राखीव आहेत. अनुसूचित जातीच्या करिता नऊ, अनुसूचित जमाती साठी तीन जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत,तर सर्वसाधारण वर्गाकरिता 84 जागा असून यामध्ये सर्वसाधारण वर्गातील महिलांना 41 जागा तर पुरुषा करिता 43 जागा आहेत. या खुल्या वर्गातील जागेवर महिला उमेदवार अर्ज दखल करू शकणार आहे. परंतु महिला करिता राखीव असलेल्या जागेवर पुरुष निवडणूक लढाऊ शकणार नाहीत. त्यामुळे खुल्या वर्गातील पुरुषांना केवळ प्रभाग क्र 3,6,7,8, 10,14, 17, 18, 19, 24 आणि 26 या प्रभागात खुल्या वर्गातील पुरुषांना निवडणुकीत उभे राहता येणार आहे. तर उर्वरित प्रभागात मात्र केवळ एकच खुल्या वर्गातील पुरुष निवडणूक लढवू शकणार आहे.
खुल्या वर्गातील इच्छुकांची नाराजी
अनेक प्रभागात ओबीसी आणि नऊ अनुसूचित जाती करिता राखीव असलेल्या प्रभागात पाच ठिकाणी महिला तर चार ठिकाणी अनुसूचित जातींचे पुरुष निवडणूक लढवू शकणार आहे. तर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या एका जागेवर पुरुष उमेदवार निवडणूक लढवू शकणार आहे. ओबीसी करिता राखीव असलेल्या 17 जागावर ओबीसी पुरुष आणि महिलाच निवडणूक लढवू शकणार आहे. त्यामुळे खुल्या वर्गातील उमेदवाराना जास्त प्रभागात आपले नशिब आजमावता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.