ठाणे : आर्थिक आमिषाला बळी पडून निवडणुकीतून माघार घेऊन मतदारांशी प्रतारणा करीत मतदानापासून वंचित ठेवले. लोकशाही संपुष्टात आल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दादाभाऊ रेपाळे, स्नेहा नांगरे आणि विक्रांत घाग आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार उबठाचे नेते माजी खासदार राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत उबाठा गटातर्फे एबी अर्ज देऊन अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या तिन्ही उमेदवारांनी स्थानिक पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिंदे शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. ही माघार सत्ताधाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संगनमत, आर्थिक आमिष आणि पोलिस यंत्रणेचा वापर करून केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
या माघार घेणाऱ्या विक्रांत घाग यांना एक पोलिस अधिकारी सोबत घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात घेऊन जातानाची चित्रफित माध्यमावर फिरत आहे. घाग यांनी पोलिसांमार्फत बंगल्यावर नेल्यानंतर माघार घेतली आहे. ही बाब आता उघड झाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विचारे यांनी केली आहे.
या तिन्ही उमेदवारांनी आर्थिक आमिषाला आणि सरकारी यंत्रणेच्या दबावाला बळी पडून माघार घेतली ही मतदारांशी प्रतारणा आहे. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून लोकशाही संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यामुळे यांच्यावर गुन्हे दाखल करुन चौकशीची तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे. या प्रकरणामुळे बिनविरोध निवडणूक आलेल्या नगरसेवकांसह सरकारी कर्मचारी आणि माघार घेतलेल्या उमेदवारांच्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.