Thane News : महापालिका कचरा शून्य अभियानाला हरताळ File Photo
ठाणे

Thane News : महापालिका कचरा शून्य अभियानाला हरताळ

पावसाळ्याच्या तोंडावर कल्याणात कचर्‍याचे ढिगारे

पुढारी वृत्तसेवा

Thane Municipal Corporation Zero Waste Campaign

सापाड : पुढारी वृत्तसेवा

कल्याण पश्चिम सापाड गावच्या मुख्य रस्त्याशेजारी साचलेल्या कचर्‍याच्या ढिगारामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी शून्य कचरा अभियाना अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला हरताळ फासण्यात आली असल्याच्या चर्चांना पालिका वर्तुळात उधाण आले आहे. त्यामुळे हा कचरा तत्काळ उचलून परिसर स्वच्छ करण्याची मागणी जोर धरू लागले आहे.

कल्याणातील सापाड गावातील वाडेघर पाडा परिसरात रस्त्याशेजारी कचर्‍याचे मोठ-मोठे ढिगारे साचल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून वर्तवण्यात आली आहे. घनकचरा अधिभार करात 300 शुल्क रुपयाने वाढवण्यात आला असून आधीच सहाशे रुपये प्रत्येक घरटी घनकचरा अधिभार लागू असताना त्यात तीनशे रुपयाची भर पडल्यामुळे आता 900 रुपये प्रत्येक घरामागे घनकचरा कर भरावा लागणार आहे. त्यामुळे एकीकडे घनकचरा करात मोठी वाढ होत असून दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढिगारे लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमधून पालिका प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

हा घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करण्यासाठी सध्या विविध पक्ष महापालिकेवर आंदोलने उभारत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत सुरू असलेल्या शून्य कचरा मोहिमेंतर्गत दररोज कचरा उचलला जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनामार्फत करीत असली, तरी आज शहरातील बहुतेक ठिकाणचा कचरा उचलला जात नसल्याचे वास्तव कल्याण पश्चिमेसह कल्याण पूर्वे परिसरात दिसत आहे. कचरा एकाच जागी साचत असल्यामुळे पावसामुळे तो कुजून त्यातून दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या कारभारामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शून्य कचरा मोहिमेचा फज्जा उडालेला दिसून येत आहे. कल्याण पश्चिम, पूर्वसह डोंबिवली आणि ग्रामीण भागातही सर्वत्र रस्त्यावर कचरा पसरला असून, येथील स्थानिक नागरिक दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत.

विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली शहरात कचरा उचलण्यासाठी 7 करोड रुपयांचा वर्षाला ठेका एका खासगी कंपनीकडे देण्यात आला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरातील प्रत्येक नागरिकाला घनकचरा व्यवस्थापन करात 300 रुपयांनी वाढ सहन करावी लागणार आहे. मात्र करोडो रुपयाचा ठेका देऊनही कल्याणातील कचर्‍याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आधारवाडी डम्पिंग बंद

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डोकेदुखी ठरलेली कचरा समस्या सोडवण्याकरिता महापालिकेने वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या आहेत. प्रत्येक प्रभागात कचरा विघटन प्रकल्पाची निर्मिती करणार असल्याने कचर्‍याचे थर निर्माण होणार नाही. यासाठी उंबर्डे आणि बारावे या ठिकाणी कचरा विघटन प्रकल्प सुरू करत आधारवाडी डम्पिंग बंद केले. ओला-सुका कचरा वर्गीकरण, कचराकुंडी हटाव मोहीम, घरपट्टीमध्ये सवलत अशा वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या आहेत. काहीअंशी पालिकेच्या प्रयत्नांना यश देखील आले, परंतु पालिकेच्या या प्रयत्नांना खिळ बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहराच्या सौंदर्याला बाधा

चिंचपाडा परिसरातील मुख्य रस्त्यालगत गेल्या अनेक महिन्यांपासून कचर्‍याचे ढिगारे रस्त्यावर पसरले आहेत. विशेष म्हणजे शून्य कचरा अंतर्गत शहरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्यामुळे कचर्‍यातून अन्नधान्याच्या शोधासाठी जनावरे कचरा अस्ताव्यस्त करून टाकत असल्याने पसरलेल्या कचर्‍यामुळे शहराचे सौंदर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील अनेक ठिकाणी साचलेले कचर्‍याचे ढिगार शहराच्या सौंदर्याला काळिमा भासत आहेत. परिणामी शून्य कचरा संकल्पनेचा दावा करणारी महापालिका जागोजागी साचलेल्या कचर्‍यामुळे फोल ठरत आहे. विशेष म्हणजे कचर्‍याच्या ठिगार्‍यातून निघणार्‍या दुर्गंधीमुळे अनेक साथीच्या आजारांना मिळणारे निमंत्रण, यातून स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

एका दिवसापेक्षा जास्त साचलेल्या कचर्‍यामधून दुर्गंधी सुटते. ती हवेत पसरून जंतूचा संसर्ग होऊ शकतो. कचर्‍याच्या ढिगारा भोवती पावसाचे पाणी साचून कचर्‍यातील बहुतेक घटक कुजले जातात. त्यामुळे या साठलेल्या पाण्यातून डासांच्या उत्पत्तीचे मार्ग मोकळा होतो. नागरिकांना श्वसनाचे त्रास उद्भवू लागतात. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्यातून आतड्यांचे विकार जडतात. त्यामुळे शारीरिक व्याधींना नागरिकांना तोंड द्यावे लागते. याशिवाय कोरोना, डेंग्यू, मलेरिया,न्यूमोनिया, टायफॉईडसारख्या आजारांचाही प्रादूर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे डॉक्टर हिंदवी भानुशाली यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT