Thane illegal Building Demolition News
ठाणे : अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यानंतर बेघर होणार्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात नागरिक बेघर होत असल्याने जोपर्यंत जमीन मालक आणि संबंधित विकासक बेघर झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन किंवा मोबदला देत नाही तोपर्यंत कारवाई करण्यात आलेल्या अनधिकृत इमारतीच्या जागेवर नवीन इमारत बांधण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आपली आयुष्यभराची पुंजी खर्च करून अनाधिकृत इमारतीमध्ये घर घेतलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उच्च न्यालयाच्या दणक्यानंतर ठाण्यातील अनाधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेने जून पासून या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून तीन महिन्यात 264 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालवला आहे. तर यापैकी जवळपास 198 बांधकामे जमीनदोस्त केली असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
अनाधिकृत बांधकाम प्रकरणी 50 जणांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.आपली आयुष्यभराची पुंजी खर्च करून नागरिकांनी या अनधिकृत इमारतींमध्ये घरे घेतली आहे. मात्र पालिकेच्या या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक बेघर होत असल्याने त्यांच्यासाठी पालिकेचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.
यापूर्वी ज्या ज्या बेकायदा इमारती पाडण्यात आल्या आहेत त्या इमारतीच्या पाडकामाचा खर्च हा संबंधधित विकासाकडून वसूल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयानुसार एखाद्या बेकायदा इमारतीवर कारवाई झाली तर यामधून नागरिक बेघर झाल्यास त्यांचे पुनर्वसन किंवा त्यांना जोपर्यंत मोबदला जमीन मालक किंवा संबंधित विकासक देणार नाही तोपर्यंत बेकायदा इमारतीच्या जागेवर नवीन इमारत बांधण्यात येणार नसल्याचा निर्णय पालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.