आर्थिक दुर्बल घटकांसाठी खाजगी लोकसहभागातून (पीपीपी तत्वावर) पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून परवडणार्या घरांची निर्मिती करण्याचा ठाणे महापालिकेने घेतलेला निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. ही घरे आता कंत्राटदार नेमून ठाणे महापालिकाच बांधणार आहे. चार वेळा निविदा काढून तसेच मुदतवाढ देऊनही कोणत्याच विकासकाचा प्रतिसाद न मिळाल्याने गेल्या सहा वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे.
यासंदर्भात नव्याने प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी अशा पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 3080 घरे बेतवडे येथील सुविधा भूखंडावर बांधण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आला होता. मात्र गेल्या सहा वर्षात या प्रकल्पाची एक विटही लागलेली नसून निविदेमधील अटी शर्थींमुळे या प्रकल्पामध्ये एकाही विकासकाने स्वारस्य दाखवलेले नाही. सुरुवातीला हा प्रकल्प पीपीपी तत्वावर राबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
यामध्ये संबंधित विकासकाने महापालिकेला घरे बांधून द्यावीत तसेच त्याच सुविधा भूखंडावर विकण्यासाठी घरे देखील बांधावी असा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र ज्या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे त्या दिवा भागात बेतवडे हा परिसर येतो. त्याठिकाणी अद्यापही फारसा विकास झालेला नाही. त्यामुळे येथे विकासक विक्रीसाठी ज्या सदनिकांची उभारणी करेल, त्याची विक्री होईल का आणि शहराप्रमाणे त्याला येथे दर मिळेल का? अशा शंका उपस्थित करण्यात आल्या. तसेच ज्या विकासकाची निवड करण्यात येणार होती त्या विकासकासमोर अनेक अटी ठेवण्यात आल्या होत्या.
यामध्ये विकासकाने सव्वा लाख चौरस मीटर क्षेत्रफळाचे यापूर्वी काम केले असावे अशी एक अट निविदेत होती. शासकीय योजनेत घरांची उभारणी करण्याचा अनुभव असणार्या विकासकांना या प्रकल्पाच्या निविदेत सहभागी होता येईल, अशी अट होती. यामुळेच निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता.
ठाणे महापालिकेने सहा वर्षात चार वेळा निविदा काढूनही कोणत्याच विकासकाने प्रतिसाद दिला नव्हता. काही महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाने निविदेतील अटी व शर्तींमध्ये बदल करत तसेच काही अटी शिथिल करत नव्याने पुन्हा निविदा काढली होती. मात्र घरांची विक्री होईल कि नाही यावर विकासकांना आत्मविश्वास नसल्याने अटी शिथिल करूनही विकासकांच्या या प्रकल्पाला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर हा प्रकल्प आता पीपीपी तत्वावर न राबवता महापालिकाच ठेकेदार नेमून या घरांची निर्मिती करणार आहे. घरे बांधण्याचा बांधकाम खर्च हा लाभार्थींकडून घेतला जाणार असून कामाची प्रगती बघून संबंधित ठेकेदाराला बील अदा केले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
या योजनेतंर्गत बेतवडे येथे दोन प्रकल्प, म्हातर्डी आणि पडले येथे प्रत्येकी एक प्रकल्प असे एकूण चार प्रकल्प राबविण्यात येणार असून या योजनेतंर्गत एकूण 3076 एवढी घरे निर्माण करण्यात येणार आहेत. आर्थिक दुर्बल घटकांसाठी या घरांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकाराकडून प्रति घर 1.5 लाख, राज्य शासनाकडून 1 लाख रूपये मिळणार असून प्रकल्प बाधित लाभार्थींना 2 लाख रूपये भरावे लागणार आहे.
ठाणे, मुंबईमध्ये घर घेणे आता सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचे झाले असून दुसरीकडे घरांच्या योजना देखील फारशा यशस्वी झाल्या नसल्याने अनेक ठाणेकरांचे घर घेणे हे केवळ स्वप्नच ठरले आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून दिवा येथील बेतवडे परिसरात परवडणार्या घरांची हि सर्वसामान्य नागरिकांना वरदान ठरणार आहे.