ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणुक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे. यानुसार, गेल्या म्हणजेच 2017 प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली असून जनगणना झालेली नसल्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ झालेली नाही. यंदाही 131 नगरसेवक आणि 33 प्रभाग अशी रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग रचनेत वाढ होण्याचे अंदाज बांधून नगरसेवक निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाला आहे.
ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत 6 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. यानंतर पालिकेने निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना तयार केली होती. तीन सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे ही रचना होती आणि या रचनेनुसार पालिकेने प्रभाग आरक्षण प्रक्रीयाही पार पाडली होती. मात्र, राजकीय पक्षांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ती वादात सापडली होती. महाविकास आघाडी तीन सदस्य प्रभागासाठी आग्रही होती तर, महायुती मात्र त्याविरोधात होती.
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पाय उतार होऊन महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर महायुतीने हि रचना रद्द केली होती. परंतु त्यानंतर निवडणुका झाल्या नाहीत. असे असतानाच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे. या प्रारुप आराखड्यावर महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार केली आहे. यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली होती. यात विविध विभागातील अधिकार्यांचा समावेश होता.
या समितीने प्रभाग रचना तयार करून ती प्रसिद्ध केली आहे. गेल्या म्हणजेच 2017 साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती. त्यात 32 प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. अशी एकूण 33 प्रभागातून 131 नगरसेवक निवडुण आले होते. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्याने प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झालेले नाही.
हिरानंदानी इस्टेटचे केले दोन प्रभागांमध्ये विभाजन
महापालिकेच्या प्रभाग रचनेत हिरानंदानी इस्टेटचे दोन प्रभागांमध्ये विभाजन केले असून, ॠहिरानंदानी रोडाजमधील 18 इमारती प्रभाग क्रमांक 1 मध्ये, तर उर्वरित 116 इमारती प्रभाग क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या रचनेविरोधात भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी आक्षेप घेतला आहे.
नगरसेवक संख्येत वाढ का नाही
2011 च्या जणगणनेनुसार शहराची लोकसंख्या 18 लाख 41 हजार 488 इतकी आहे. तर, 2017 साली झालेल्या निवडणुकीत मतदारांची संख्या 13 लाख 90 हजार 973 इतकी होती. या मतदार संख्येत गेल्या काही वर्षात वाढ झाली आहे. दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. परंतु करोनामुळे यंदा जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळे 2011 च्या जणगणनेनुसार प्रभागांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ झालेली नाही. यात चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत 50 ते 62 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. तर, तीन सदस्यांचा प्रभाग 38 हजार लोकसंख्येचा करण्यात आला आहे.