ठाणे : पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेल्यावरही ठाणे महापालिकेच्या लेखा वित्त अधिकारी पदी असलेल्या दिलीप सूर्यवंशी यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी दीपक शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
27 ऑक्टोबर रोजी दीपक शिंदे यांच्या नियुक्तीची ऑर्डर निघाल्यानंतर ते या पदावर रुजू झाल्याचे समजते. मात्र, दीपक शिंदे हे एकदा ठाणे महापालिकेत आले, त्यानंतर पुन्हा ते ठाणे महापालिकेत आलेच नाहीत. त्यांनी अद्याप आपला पदभार देखील स्वीकारलेला नाही. त्यामुळे सध्या बिलांवर जुनेच लेखा वित्त अधिकारी सह्या करत असल्याची पालिकेच्या वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.
ठाणे महापालिकेचा लेखा आणि वित्त विभाग अतिशय महत्वाचा विभाग असून ठाणे महापालिका क्षेत्रात झालेल्या कामांचे बिल याच विभागामार्फत काढले जाते. त्यामुळे या पदावर वर्णी लागावी यासाठी अनेक अधिकाऱ्यांचे प्रयत्न असतात. ठाणे महापालिकेच्या लेखा आणि वित्त अधिकारी पदी पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही दिलीप सूर्यवंशी हे या पदावर रुजू होते. कालावधी उलटूनही त्यांची बदली का करण्यात आली नव्हती, याबाबत अनेकवेळा चर्चा रंगली होती. अखेर पालिका निवडणुकीपूर्वी सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली असून 27 ऑक्टोबर त्यांच्या जागी दीपक शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक शिंदे यांची या पदावर नियुक्ती झाल्यानंतर शिंदे यांनी पालिकेत हजेरी देखील लावली होती. यावेळी सूर्यवंशी यांचा निरोप समारंभ देखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांच्याकडून शिंदे हे पदभार स्वीकारतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र पालिकेत हजेरी लावूनही ते पुन्हा पालिकेत का फिरकले नाहीत? त्यांनी अद्याप त्यांचा पदभार का स्वीकारला नाही? तर अजूनही बिलांवर जुनेच लेखा वित्त अधिकारी सह्या करत आहेत का? असे अनेक प्रश्न पालिका वर्तुळात विचारले जात आहे.