ठाणे: ठाणे महापालिकेच्या सलग तिसऱ्या महासभेत शिवसेनेकडून बहुमताच्या जोरावर पाच मिनिटांत 232 विषय मंजूर केले जात असल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला.
त्यानंतर उपमहापौर कृष्णा पाटील व गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर, अचानक राष्ट्रगीत सुरू करून महासभा गुंडाळण्यात आली. त्यानंतर सभागृहाबाहेर शिवसेना हाय हाय...च्या घोषणा देत भाजपाच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या सभागृहातील वर्तनाचा निषेध केला.
महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांच्याकडून एल् निनोमुळे भविष्यात होणाऱ्या परिस्थितीबाबत लक्षवेधी सूचना दाखल करण्यात आली होती. या सूचनेवर सुमारे पाच तास चर्चा झाली. त्यानंतर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सचिवांना विषयपत्रिकेवरील कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी एकाचवेळी सर्व विषय बहुमताने मंजूर करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी विरोध केला. विषयपत्रिकेआधी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करावी, अशी आग्रही मागणी केली. त्याला भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नम्रता कोळी, मृणाल पेंडसे यांच्यासह नगरसेवकांनी पाठिंबा दिला.
मात्र, महापौरांसह शिवसेनेचे नगरसेवक विषयपत्रिका मंजूर करण्यावर ठाम होते. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी गटनेता बैठकीत सर्वात आधी लक्षवेधी सूचनेवर चर्चा होणार असल्याचे मान्य केल्याची आठवण करून दिली. मात्र, भाजपचे सदस्य विषयपत्रिकेवर चर्चेसाठी ठाम राहिले.
एमआयएमचे गटनेते सैफ पठाण यांनीही सर्व विषय 5 मिनिटांत मंजूर करण्याऐवजी प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे चर्चा करावी, अशी आग्रही मागणी केली. परंतु, शिवसेनेच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. प्रश्नोत्तराचा सर्व तपशील सर्व सदस्यांना लेखी पाठविण्यात येईल, असे सचिव मनिष जोशी यांनी सभागृहात सांगितले. त्याआधी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आपले आसन सोडून सभागृहात येऊन पहिल्याच विषयाला माझा आक्षेप आहे. तो मंजूर करू नये, अशी मागणी केली. मात्र, शिवसेनेने बहुमताच्या जोरावर एक विषय वगळता सर्व विषय मंजूर करून घेतले.
अखेर भाजपच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, काही क्षणांतच सभागृहात नगरसेवक मनोज शिंदे व नगरसेवक राजेश मोरे यांनी अचानक राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यानंतर महासभेचे कामकाज गुंडाळण्यात आले. सभागृहाचे कामकाज संपले नसतानाच, अचानक राष्ट्रगीत सुरू केल्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान झाला आहे, असा आरोप करीत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येईल, असा इशारा दिला.
गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपचे नौपाडा पोलीस स्टेशनला निवेदन...
विषयावर चर्चा करून देत नसल्याने भाजपच्या सदस्यांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, काही क्षणांतच सभागृहात नगरसेवक मनोज शिंदे व नगरसेवक राजेश मोरे यांनी अचानक राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यानंतर महासभेचे कामकाज गुंडाळण्यात आले. सभागृहाचे कामकाज संपले नसतानाच, अचानक राष्ट्रगीत सुरू केल्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान असल्याचे सांगत भाजपच्या नगरसेवकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पायी चालत नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन दिले आहे.
शिवसेने (शिंदे) कडून मनमानी पद्धतीने लक्षवेधी सूचनेवर आधी चर्चा सुरू करण्यात आली. त्यानंतर सातत्याने पाच मिनिटांत 200 ते 300 विषय मंजूर केले जात असल्याच्या पद्धतीला भाजपचा विरोध आहे. विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही महापौरांना सांगत असताना अचानक शिवसेनेकडून राष्ट्रगीत सुरू करण्यात आल्याने हा राष्ट्रगीताचा अवमान असून यासंदर्भात आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी नौपाडा पोलीस ठाण्याला निवेदन दिले आहे.- कृष्णा पाटील, उपमहापौर, ठामपा.