ठाणे: ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारातच एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला मारहाण झाल्याची घटना मंगळवारी समोर आली. पार्किंगच्या वादातून महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या चालकाने एका वृत्तवाहिनीचे कॅमेरामन विनय राजभर यांना मारहाण केली आहे.
या घटनेत राजभर जखमी झाले असून, नौपाडा पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केवळ संबंधित चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात वृत्तवाहिनीची गाडी उभी असताना पार्किंगच्या कारणावरून वाद झाला. यावेळी महापौरांचे चालक सुनील खरपडे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
कॅमेरामन विनय राजभर आणि त्यांच्या वाहनचालकाने याबाबत जाब विचारला असता, खरपडे यांनी राजभर यांची कॉलर पकडून त्यांचा गळा दाबत मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात राजभर जखमी झाले.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर ठाण्यातील पत्रकारांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
महापालिका मुख्यालयासारख्या प्रशासकीय इमारतीच्या आवारातच पत्रकारावर मारहाणीचा प्रकार घडल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पत्रकारांना वार्तांकन करताना अशा प्रकारांना सामोरे जावे लागत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. मिरा-भाईंदर येथील पत्रकारावरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही असा प्रकार घडल्याने पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ठाणे दैनिक पत्रकार संघाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही या घटनेच्या पार्श्वभूमीवर केली जात आहे.
या घटनेची ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने दखल घेतली आहे. मात्र संबंधित चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत प्रशासनाला चौकशीचे निर्देश दिले आहेत.
मारहाणीचे समर्थन नाही : महापौर
या घटनेवर प्रतिक्रिया देताना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी संबंधित चालकाच्या कृत्याचे समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले. मारहाण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. चालक माझा असला, तरी मी अशा कृत्यांचे समर्थन करणार नाही किंवा त्याला पाठीशी घालणार नाही. या प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.
मारहाण करणाऱ्या चालकावर कारवाई होणार : एकनाथ शिंदे
ठाण्याच्या महापौरांच्या चालकाकडून पत्रकाराला झालेल्या मारहाणीच्या घटनेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकाराला मारहाण करणे अत्यंत चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहिलो आहोत. संबंधित व्यक्तीने काही चूक केली असेल, तर त्याची चौकशी करून नक्कीच कारवाई केली जाईल, असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
चालकाला निलंबित करा : अविनाश जाधव
ठाणे येथे कॅमेरामनला महापौरांच्या चालकाकडून मारहाण झाल्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. पत्रकार आणि कॅमेरामन यांना निर्भयपणे आपले कर्तव्य बजावता आले पाहिजे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर होणारी कोणतीही हिंसा खपवून घेतली जाणार नाही. उद्या ठाणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन संबंधित चालकाला निलंबित करण्याची मागणी करणार आहोत. जोपर्यंत संबंधित चालकावर योग्य ती कारवाई करून त्याला निलंबित केले जात नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.